अग्निवीर भरती मेळाव्याच्या तयारीचा आढावा; १७ ते २९ सप्टेंबरदरम्यान कोल्हापुरात भरती प्रक्रिया

कोल्हापुरात १७ ते २९ सप्टेंबरदरम्यान अग्निवीर भरती मेळावा होणार आहे. भरतीच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली.

अग्निवीर भरती मेळाव्याच्या तयारीचा आढावा; १७ ते २९ सप्टेंबरदरम्यान कोल्हापुरात भरती प्रक्रिया
अग्निवीर भरती 2026, अग्निवीर भरती मेळावा, कोल्हापूर अग्निवीर भरती, भारतीय सैन्य भरती, अग्निवीर भरती सप्टेंबर, छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर न्यूज, महिला लष्कर भरती, सैन्य भरती

प्रतिनिधी : उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. ८ (जिमाका) : अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय सैन्य भरती कार्यालयामार्फत १७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख यंत्रणांची आढावा बैठक विभागीय क्रीडा संकुल येथे घेण्यात आली.

संबंधित विभागांनी जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भरती मेळाव्याशी संबंधित विविध विभागांना सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने आणि काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या.

भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होता कामा नये. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्याही मध्यस्थाच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रत्येक संबंधित विभागाने त्यांच्या विभागाचा नोडल अधिकारी आणि त्यांचा मोबाईल क्रमांक निश्चित करावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसेच आढावा बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सातारा, सांगली, कोल्हापूरसह गोव्यातील उमेदवार पात्र

या अग्निवीर भरती मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसह गोवा राज्यातील दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा जिल्ह्यात अधिवास असणारे उमेदवार पात्र ठरणार आहेत.

संपूर्ण लष्करी भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारेच पार पडणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

मैदान, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवर भर

भरती मेळाव्यासाठी सर्व आवश्यक सुविधांनी युक्त मैदान उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मोठ्या संख्येने उमेदवार येणार असल्याने गर्दी नियंत्रणासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

तसेच भरती प्रक्रियेदरम्यान लष्करी अधिकाऱ्यांसाठी निवास व वसतिगृहाची व्यवस्था, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्याबाबतही संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.

दररोज पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टँकरची मागणी

भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांसाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रतिदिन पाच हजार लिटर क्षमतेच्या पाणी टँकरची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.

भरती मेळाव्याच्या विविध दिवसांमध्ये उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने आरोग्य, पाणी, स्वच्छता, वाहतूक आणि सुरक्षा या बाबींवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले.

२९ सप्टेंबरला महिला लष्कर भरती

२९ सप्टेंबर रोजी महिला लष्कर भरती होणार असल्याने त्या दिवशी दोन शिफ्टमध्ये महिला पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी कर्नल तथा संचालक (भरती) सैनिक कार्यालय प्रशांतसिंग यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.

भरती प्रक्रियेदरम्यान जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य आणि मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी प्रशांतसिंग यांना दिले.

विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा

बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी एमएसईबी, बीएसएनएल, शिवाजी विद्यापीठ, पार्किंग व वाहतूक व्यवस्था, आरोग्य, महापालिका शिक्षण विभाग, रोजगार कार्यालय आणि पोलीस बंदोबस्त यांसह विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

भरती मेळावा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी आपापसातील समन्वय वाढवून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती

आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, मनपा उपायुक्त किरणकुमार धनवडे, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, करवीर तहसीलदार स्वप्निल पवार, सुभेदार मेजर लखविंदरसिंग, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मस्के, मोटार वाहन निरीक्षक योगेश सरोदे, डॉ. रेश्मा पाटील, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भीमसेन चवदार, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.