‘इंद्रधनुष्य २०२६’मध्ये मुंबई विद्यापीठाचे निर्विवाद वर्चस्व; २१व्यांदा सर्वसाधारण विजेतेपद
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजित २२ व्या आंतरविद्यापीठीय युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२६’मध्ये मुंबई विद्यापीठाने २१व्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला उपविजेतेपद मिळाले. महोत्सवात महाराष्ट्रातील २७ विद्यापीठांचे १,१२३ विद्यार्थी सहभागी झाले होते.
नाशिक ब्यूरो:
नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजित २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २०२६’मध्ये मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या महोत्सवाच्या २२ वर्षांच्या इतिहासात मुंबई विद्यापीठाने तब्बल २१व्यांदा विजेतेपद मिळविण्याचा विक्रम केला आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने उपविजेतेपद मिळविले. विशेष म्हणजे ‘गोल्डन गर्ल’ आणि ‘गोल्डन बॉय’ हे दोन्ही मानाचे पुरस्कारही मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पटकावले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘कविवर्य कुसुमाग्रज नगरी’तील गोदावरी मंडपम येथे १९ ते २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पाच दिवस हा सांस्कृतिक महाकुंभ उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील २७ विद्यापीठांचे १,१२३ विद्यार्थी आणि संघव्यवस्थापकांसह जवळपास १,२५० जणांनी या महोत्सवात सहभाग घेतला.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची पुरस्कारांवर मोहोर
महोत्सवात विविध कलाप्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या कु. श्रीलक्ष्मी सत्यानंदन हिने ‘गोल्डन गर्ल’ पुरस्कार पटकावला. तर प्रथमेश म्हात्रे, आर्य गोडबोले आणि हर्षकिरण परिहार यांना संयुक्तपणे ‘गोल्डन बॉय’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कलाप्रकारनिहाय सात विभागांपैकी संगीत, नृत्य, रंगमंच आणि फाइन आर्ट या चार विभागांमध्ये मुंबई विद्यापीठाने विजेतेपद मिळविले. साहित्य प्रकारात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने बाजी मारली. लघुपट प्रकारात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने, तर शोभायात्रा प्रकारात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीने विजेतेपद पटकावले.
यजमान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानेही उल्लेखनीय कामगिरी करत लघुपट, भारतीय शास्त्रीय गायन, मातीकला, नक्कल आणि स्थापत्य कला अशा पाच स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविली.
२७ विद्यापीठांचे १,१२३ विद्यार्थी सहभागी
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलपती तथा राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या निर्देशानुसार या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्राच्या वतीने आयोजित या महोत्सवात संगीत, नृत्य, वाङ्मयीन कला, रंगमंचीय कला, ललित कला, लघुपट आणि शोभायात्रा अशा सात प्रमुख कलाप्रकारांअंतर्गत एकूण २९ स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धांमध्ये ४८६ विद्यार्थिनी आणि ६३७ विद्यार्थी अशा एकूण १,१२३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी आपापल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविले.
महोत्सवासाठी विद्यापीठ परिसरात ‘चित्रमहर्षी दादासाहेब फाळके मंच’, ‘पं. विष्णू दिगंबर पलुस्कर मंच’, ‘प्रा. वसंत कानेटकर मंच’, ‘स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मंच’ आणि ‘शिल्पकार राम सुतार मंच’ असे विविध मंच उभारण्यात आले होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण
महोत्सवाच्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मनोहर चासकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्यासह विविध विद्यापीठांचे अधिकारी, समित्यांचे सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते २९ स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगला समारोप
समारंभाची सुरुवात नटराज पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर आदिवासी नृत्य आणि लावणी नृत्याचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. विद्यापीठाच्या दृक्-श्राव्य विभागाने तयार केलेले ‘इंद्रधनुष्य गीत’ आणि महोत्सवावरील लघुचित्रफीतही यावेळी प्रदर्शित करण्यात आली.
विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्राचे संचालक डॉ. दयाराम पवार यांनी प्रास्ताविक केले. ललित कला केंद्राचे संचालक सचिन शिंदे यांनी स्पर्धांच्या निकालाचे वाचन केले. सांस्कृतिक समन्वयक प्रा. दत्ता पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव प्रा. सुरेंद्र पाटोळे यांनी आभार मानले.
४२ समित्यांच्या नियोजनातून महोत्सव यशस्वी
या पाच दिवसीय महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाने आयोजन, स्वागत, उद्घाटन व समारोप, भोजन, निवास, आरोग्य, सुरक्षा, वित्त आणि परीक्षण अशा विविध जबाबदाऱ्यांसाठी एकूण ४२ समित्यांची स्थापना केली होती.
महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी लोकभवनाच्या निरीक्षण व वित्त समितीने विद्यापीठाला भेट देऊन पाहणी केली होती. महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे पदाधिकारी व सदस्य, विद्यापीठातील सर्व विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक समृद्ध करणारा ‘इंद्रधनुष्य २०२६’ हा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.