छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा; शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेत जायकवाडी प्रकल्पावरील कामे गतीने पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.
मराठवाडा| ब्यूरो : लक्ष्मण चौरे
मुंबई: छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध, नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पावर आधारित पाणीपुरवठा योजनेचे सर्व काम विहित कालावधीत पूर्ण करून नागरिकांना अखंड पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री निवास 'वर्षा' येथे छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार डॉ. भागवत कराड उपस्थित होते. तर इतर मंत्री व वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणांना योजनेचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शहरातील अपूर्ण जलटाक्या, वितरण प्रणाली आणि इतर रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.
शहरातील वितरण व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नसल्यामुळे नागरिकांना अपेक्षित प्रमाणात पाणीपुरवठा करता येत नसल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित विभागाने स्थळ पाहणी करून कंत्राटदारासोबत स्वतंत्र बैठक घेऊन कामांना गती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
हायड्रोलिक टेस्टिंग आणि नळजोडण्यांवर भर
महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभाग यांनी समन्वयाने काम करून योजना पूर्णत्वास न्यावी, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, शहरातील नळजोडण्यांचे प्रमाण वाढवावे, वितरण प्रणालीचे 'हायड्रोलिक टेस्टिंग' पूर्ण करावे आणि कंत्राटदाराच्या कामाचे नियमित मूल्यांकन करावे.
योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून टप्प्याटप्प्याने कृती आराखडा तयार करून पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
रस्ते दुरुस्तीला प्राधान्य
पाणीपुरवठा वितरणासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांचे रेस्टोरेशनचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. विशेषतः पावसाळ्यात खोदलेल्या रस्त्यांमुळे अपघात होणार नाहीत, याची दक्षता घेण्यावर त्यांनी भर दिला.
योजनेची सद्यस्थिती
बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी योजनेचे सादरीकरण केले.
छत्रपती संभाजीनगर शहराच्या २०५२ सालच्या लोकसंख्येचा विचार करून दररोज ६०४ एमएलडी (मिलियन लिटर प्रतिदिन) पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत ५९ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार असून त्यापैकी २९ टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे.
तसेच शहरातील १,९११ किलोमीटर पाणी वितरण जाळ्यापैकी १,२९१ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून आतापर्यंत ४६ हजार ५०० नवीन नळजोडण्या देण्यात आल्या आहेत.
बैठकीस संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती अध्यक्ष अनिल मकरिये, अपर मुख्य सचिव के. गोविंदराज, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव नायक, महापालिका आयुक्त अमोल येडगे, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त जी. श्रीकांत तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0