राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते रायगडमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळेला स्कुलबस प्रदान

सुमन रमेश तुलसियानी ट्रस्टतर्फे रायगड जिल्ह्यातील रातवड येथील माध्यमिक विद्यामंदिराला स्कुलबस प्रदान करण्यात आली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन येथे आयोजित कार्यक्रमात या बसचे हस्तांतरण करण्यात आले.

Jun 20, 2026 - 23:55
 0  2
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते रायगडमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळेला स्कुलबस प्रदान
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील रातवड येथील माध्यमिक विद्यामंदिराला स्कुलबस प्रदान करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी आणि शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबई, प्रतिनिधी : संदीप गिरकर 

दि. २० : रायगड जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांना बळकटी देण्यासाठी सुमन रमेश तुलसियानी ट्रस्टतर्फे रातवड येथील छत्रपती शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यामंदिराला स्कुलबस प्रदान करण्यात आली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवन येथे आयोजित कार्यक्रमात या बसचे विधिवत हस्तांतरण करण्यात आले.

या कार्यक्रमास सुमन रमेश तुलसियानी ट्रस्टचे विश्वस्त मनीष रुपाणी, नाना पालकर स्मृती समितीचे पदाधिकारी कृष्णा महाडिक, छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याणचे मानद सचिव डॉ. निलेश रेवगडे तसेच संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना

रायगड जिल्ह्यातील रातवड येथील माध्यमिक विद्यामंदिरामध्ये आठ गावांतील तसेच चार आदिवासी पाड्यांतील एकूण १९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या दळणवळणाच्या अडचणी दूर करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या स्कुलबस सेवेचा मोठा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे.

शाळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक सुविधेमुळे शाळेच्या पटसंख्येत ४२ विद्यार्थ्यांची वाढ झाली असून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत येणे अधिक सुलभ झाले आहे.

ट्रस्टचे सामाजिक कार्य सुरूच

कार्यक्रमात बोलताना ट्रस्टच्या प्रतिनिधींनी सांगितले की, सुमन रमेश तुलसियानी ट्रस्टतर्फे आतापर्यंत विविध भागांतील शैक्षणिक संस्थांना एकूण ९ स्कुलबस प्रदान करण्यात आल्या आहेत.

ट्रस्टचे प्रेरणास्थान असलेले रमेश तुलसियानी आणि सुमन तुलसियानी यांचे अलीकडेच अवघ्या १५ दिवसांच्या अंतराने निधन झाले असले तरी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ट्रस्टचे समाजोपयोगी आणि सेवाभावी कार्य आजही अविरत सुरू असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0