अमित शहा यांच्या हस्ते १४४५.९७ कोटींच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा शुभारंभ; वारसा संवर्धनासह आधुनिक सुविधांना चालना
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. मंदिर संवर्धन, वारसा जतन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि धार्मिक पर्यटन विकासाला चालना देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे.
कोल्हापूर प्रतिनिधी: उमेश जाधव
कोल्हापूर, दि. २० (जि.मा.का.) : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखड्यांतर्गत १४४५.९७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या कोनशीलेचे अनावरण करून शुभारंभ करण्यात आला. मंदिर जतन, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना देणारा हा राज्यातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महापौर रुपाराणी निकम, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेत विधिवत पूजा केली. त्यानंतर मंदिर परिसरातील रामाचा पार येथे उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन प्रदक्षिणा मार्ग, परिवार देवता मंदिर संवर्धन तसेच मुख्य मंदिर जतन आणि परिसर विकास कामांच्या कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंदिर विकास आराखड्याच्या प्रदर्शनाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी उपस्थितांना दिली.
हजारो वर्षांच्या वारशाला आधुनिकतेची जोड
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर हे देशातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक असून हजार वर्षांहून अधिक इतिहास लाभलेले हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हेमाडपंथी स्थापत्यशैली, समृद्ध शिल्पकला आणि धार्मिक परंपरांचा वारसा लाभलेल्या या मंदिराच्या जतनासाठी राज्य शासनाने व्यापक विकास आराखडा मंजूर केला आहे.
मंदिर परिसरातील पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण, वारसा संवर्धन, भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि धार्मिक पर्यटनाचा विकास यांचा समतोल साधत हा आराखडा राबविण्यात येणार आहे. यामुळे मंदिर परिसराचे वैभव वाढण्याबरोबरच भाविकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
पहिल्या टप्प्यात १४३.९० कोटींच्या कामांना मंजुरी
६ मे २०२५ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पासाठी १४४५.९७ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात १४३.९० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
सध्या मूळ मंदिराच्या संवर्धनासाठी ३२.९६ कोटी रुपये खर्चाची कामे सुरू असून विद्युतीकरण, सीसीटीव्ही आणि प्रकाशयोजना यासाठी २३.०५ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. याशिवाय मंदिर परिसरातील ४१ लहान-मोठ्या मंदिरांचे संवर्धन, नगर प्रदक्षिणा मार्गाचे सुशोभीकरण आणि परिसर विकासाची विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत.
भाविकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा
तीन टप्प्यांत राबविण्यात येणाऱ्या या विकास आराखड्यात दर्शन मंडप, अन्नछत्र, देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र स्वच्छतागृहे, चप्पल स्टँड, व्यापारी संकुले, अँफीथिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टिपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह तसेच मोठ्या प्रमाणावर वाहनतळ उभारण्यात येणार आहेत.
या प्रकल्पासाठी सुमारे २८,०५८ चौरस मीटर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून आवश्यक भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येणारा हा विकास आराखडा कोल्हापूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास राज्य शासनातील मंत्री, लोकप्रतिनिधी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0