श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रथासाठी बैलजोडीची निवड; मुरंबी व सुरेगावच्या शेतकऱ्यांना मान

आषाढी वारी पायी पालखी सोहळा २०२६ साठी श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रथासाठी बैलजोडीची निवड संपन्न झाली. इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील गजराम पुंजा मते आणि सिन्नर तालुक्यातील सुरेगाव येथील संपत भालेराव यांच्या बैलजोडीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Jun 15, 2026 - 19:36
 0  22
श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रथासाठी बैलजोडीची निवड; मुरंबी व सुरेगावच्या शेतकऱ्यांना मान
संत निवृत्तीनाथ महाराज पालखी, बैलजोडी निवड, आषाढी वारी 2026,

नाशिक ब्युरो | अमर ठोंबरे

आगामी आषाढी वारी पायी पालखी सोहळा २०२६ साठी श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी रथासाठी बैलजोडी निवड सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावर्षी इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील शेतकरी गजराम पुंजा मते तसेच सिन्नर तालुक्यातील सुरेगाव येथील संपत भालेराव यांच्या बैलजोडीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

वारकरी संप्रदायातील पालखी सोहळ्यामध्ये बैलजोडीचा मान अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. श्रद्धा, सेवा आणि पावित्र्य जपत शेतकरी आपल्या बैलांची वर्षभर विशेष काळजी घेत असतात. संतांच्या पालखी रथाला जुंपल्या जाणाऱ्या बैलांची सेवा ही वारकरी परंपरेतील एक मोठी आणि पुण्यदायी सेवा मानली जाते.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या सुमारे ४५ दिवसांच्या पायी प्रवासादरम्यान बैलांची योग्य निगा राखणे, त्यांना वेळेवर चारा-पाणी देणे, त्यांची आरोग्याची काळजी घेणे आणि दररोज रथासाठी सजविणे ही अत्यंत जबाबदारीची सेवा असते. पालखी मार्गावरील अनेक गावांमध्ये संतांच्या पालखीप्रमाणेच बैलजोडीचेही भक्तिभावाने पूजन केले जाते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान यांच्या वतीने बैलजोडीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांमधून योग्य बैलजोडीची निवड करण्यात आली.

या निवड प्रक्रियेस संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल महाराज साळुंखे, विश्वस्त ह.भ.प. कांचनताई जगताप, नारायण दादा मुठाळ, इतर विश्वस्त मंडळ सदस्य तसेच संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. निवड झालेल्या बैलजोडीच्या मालकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

गणेश मते यांची भावना

यावेळी प्रतिक्रिया देताना श्री गणेश मते म्हणाले,

"श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या आषाढी वारी पालखी सोहळ्यात संत निवृत्तीनाथ संस्थानच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाला बैलजोडीच्या सेवेत सहभागी होण्याची संधी मिळाली, याचा आम्हाला अभिमान आहे. या मुक्या प्राण्यांमुळे आम्हाला संतसेवेचे भाग्य लाभले. संतांच्या पादुका पंढरपूरपर्यंत घेऊन जाण्याचा मान आमच्या घराण्याला मिळाला, यासाठी समस्त वारकरी आणि संत निवृत्तीनाथ संस्थानचे मी मनःपूर्वक आभार मानतो."

आषाढी वारीच्या पारंपरिक सोहळ्यात बैलजोडीची निवड ही केवळ एक औपचारिकता नसून श्रद्धा, सेवा आणि वारकरी संस्कृतीचे जतन करणारी एक पवित्र परंपरा मानली जाते.

✍️ अमर ठोंबरे

नाशिक ब्युरो प्रमुख

पत्रकार, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर

प्रसिद्धी प्रमुख, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थान आषाढी वारी पालखी सोहळा

🚩 त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या दैनंदिन घडामोडी, वारकरी सेवा उपक्रम आणि विशेष वृत्तांसाठी वाचत राहा. 🚩

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.