घाटकोपरमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात; चिमुकल्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत, पराग शाह यांची उपस्थिती
घाटकोपर (पूर्व) येथील महानगरपालिका शाळा क्र. ३ मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. सेवाभावी आमदार पराग शाह, पालकमंत्री अॅड. आशिष शेलार, महापौर ऋतुताई तावडे आणि नगरसेविका राखी जाधव यांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांचे प्रेमपूर्वक स्वागत करण्यात आले.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबईतील घाटकोपर (पूर्व) परिसरात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. महानगरपालिका शाळा क्र. ३, पंतनगर पोलीस ठाणे परिसर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शाळेचा पहिला दिवस – प्रवेशोत्सव’ कार्यक्रमात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला सेवाभावी आमदार पराग शाह यांनी विशेष उपस्थिती लावली. तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री अॅड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे आणि स्थायी समिती सदस्य तथा नगरसेविका राखी जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नगरसेविका राखी जाधव यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने प्रथमच शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे फुलांनी, शुभेच्छांनी आणि आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि शाळेबद्दल आत्मीयता वाढावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. नवीन शैक्षणिक प्रवासाला सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, जिल्हा महामंत्री भावेश भानुशाली, अशोक राय, पंतनगर-वाधवा मंडळ अध्यक्ष रचितकुमार त्रिवेदी, मंडळ महामंत्री संजय (बाबू) दरेकर, महिला मोर्चा अध्यक्षा अनु खत्री, वॉर्ड क्र. १३१ अध्यक्ष सचिन विष्णू भोसले, महिला मोर्चा अध्यक्षा गीता अविनाश जाधव, विना लाड, अनिता अतितकर, तुषार कांबळे, राणा सिंह यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्साह, आनंद आणि सकारात्मक ऊर्जेच्या वातावरणात पार पडलेल्या या प्रवेशोत्सवाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाची संस्मरणीय सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0