म्हाडा नाशिक मंडळाच्या ३३३ सदनिकांची संगणकीय सोडत; ३४१ अर्जदार अनामत रकमेसह पात्र

म्हाडा नाशिक मंडळातर्फे नाशिक व अहिल्यानगर येथील विविध गृहप्रकल्पांतील ३३३ सदनिकांच्या विक्रीसाठी २२ सप्टेंबर २०२६ रोजी संगणकीय सोडत काढण्यात आली. सोडतीसाठी ४९३ अर्ज प्राप्त झाले असून ३४१ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले.

Sep 22, 2026 - 22:15
 0  9
म्हाडा नाशिक मंडळाच्या ३३३ सदनिकांची संगणकीय सोडत; ३४१ अर्जदार अनामत रकमेसह पात्र
MHADA Nashik, म्हाडा नाशिक, MHADA Lottery 2026, म्हाडा सोडत 2026, 333 Flats MHADA, नाशिक म्हाडा सदनिका

मुंबई ब्यूरो: अनिल सावरे 

नाशिक : नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) नाशिक शहर परिसरासह अहिल्यानगर येथील विविध गृहप्रकल्पांमधील ३३३ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर २०२६) उत्साहात पार पडली. नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली.

नाशिक मंडळाच्या राम गणेश गडकरी चौकातील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे, उपमुख्य अधिकारी प्रवीण बागूल, मिळकत व्यवस्थापक नितिन कुलथे, उच्चस्तरीय देखरेख समितीचे सदस्य प्रकाश महाजन, उपजिल्हाधिकारी व विशेष भूसंपादन अधिकारी रविंद्र भारदे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी विक्रम नैन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नाशिक मंडळाच्या पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, मखमलाबाद शिवार, चुंचाळे शिवार, आडगाव शिवार, सातपूर शिवार तसेच अहिल्यानगर येथील म्हाडा गृहनिर्माण योजनांमधील विविध गृहप्रकल्पांतील सदनिकांचा या सोडतीत समावेश करण्यात आला होता.

या सोडतीसाठी एकूण ४९३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी अनामत रकमेसह ३४१ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संगणकीय पद्धतीने पारदर्शक प्रक्रिया राबवत ३३३ सदनिकांसाठी पात्र अर्जदारांची निवड करण्यात आली.

यावेळी बोलताना सभापती रंजन ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षात म्हाडाच्या नाशिक मंडळाने विविध सोडतींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत. आजच्या सोडतीच्या माध्यमातून ३३३ अर्जदारांची गृहस्वप्नपूर्ती होत आहे, असे त्यांनी नमूद केले.

भविष्यातही नाशिक मंडळातर्फे सदनिका विक्रीसाठी अशाच प्रकारे संगणकीय सोडतीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. आजच्या सोडतीत घर न लागलेल्या अर्जदारांनी निराश न होता आगामी सोडतीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, सोडतीमध्ये निवड झालेल्या अर्जदारांचा सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते सभागृहात सत्कार करण्यात आला. त्यामुळे विजेत्या अर्जदारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

सोडतीची प्रक्रिया अर्जदारांना घरबसल्या पाहता यावी, यासाठी म्हाडातर्फे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या अधिकृत @mhadaofficial YouTube आणि Facebook चॅनलवर करण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित राहता न आलेल्या अर्जदारांनाही सोडतीची प्रक्रिया ऑनलाइन पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली.

३३३ सदनिकांच्या या संगणकीय सोडतीमुळे नाशिक आणि अहिल्यानगर परिसरातील अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.