दलित आणि सवर्णांना जोडून सामाजिक ऐक्य उभारूया; सांगलीत रामदास आठवले यांचे आवाहन

तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आल्याबद्दल सांगलीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी दलित, मराठा आणि सवर्ण समाजाला जोडून सामाजिक ऐक्य उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.

Apr 29, 2026 - 00:29
 0  3
दलित आणि सवर्णांना जोडून सामाजिक ऐक्य उभारूया; सांगलीत रामदास आठवले यांचे आवाहन
रामदास आठवले सांगली,

सांगली प्रतिनिधि 

सांगली : दलित, मराठा आणि सवर्ण समाजाला एकत्र आणून सामाजिक ऐक्य निर्माण करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगली येथे केले.

तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आल्याबद्दल सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “मी सांगलीचा आहे. माझ्या चळवळीची सुरुवातही सांगलीतूनच झाली. या शहराने मला नेहमीच भरभरून प्रेम दिले. तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आलो असून सांगलीचे ऋण फेडण्यासाठी मंत्रिपदाचा लाभ या जिल्ह्याला कायम देईन.”

भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी आपल्या खास शैलीत चारोळ्या सादर करत सांगलीचे कौतुक केले.

ते पुढे म्हणाले की, चळवळीत काम करत असताना माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी संपर्क आला. त्यांनी मला प्रेरणा दिली. दलित आणि मराठा समाज एकत्र आणण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यामुळेच मी गावोगावी पोहोचलो आणि आज या पदापर्यंत पोहोचलो.

यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार राज्यभर आणि देशभर पोहोचवण्याचे काम रामदास आठवले यांनी केले आहे. त्यामुळेच ते वंचितांचे मंत्री म्हणून ओळखले जातात.”

आमदार इद्रिस नायकवडी यांनीही मनोगत व्यक्त करताना आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव सांगितले.

या कार्यक्रमास आमदार दिलीप सोपल, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजप नेते दीपक शिंदे-म्हैसाळकर, आदर्श सरपंच भीमराव माने, काँग्रेसचे नगरसेवक राजेश नाईक, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, जैन सभेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील, प्रा. सीमा आठवले, कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल पाटील, गगनराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन जगन्नाथ ठोकळे यांनी मानले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0