आळसणा येथे श्रीगुरुदेव बाल सुसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम सेवाभावी ट्रस्ट, आळसणा यांच्या वतीने आयोजित १० दिवसीय श्रीगुरुदेव बाल सुसंस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम उत्साहात पार पडला. चार जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी विविध प्रशिक्षण उपक्रमांमध्ये सहभाग घेत संस्कार, योग, अध्यात्म आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे घेतले.

May 31, 2026 - 21:31
 0  37
आळसणा येथे श्रीगुरुदेव बाल सुसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप
श्रीगुरुदेव बाल सुसंस्कार शिबिर, आळसणा, शेगाव, बुलढाणा

महेंद्र मिश्रा | बुलढाणा प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम सेवाभावी ट्रस्ट, आळसणा (ता. शेगाव, जि. बुलढाणा) यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या श्रीगुरुदेव बाल सुसंस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राष्ट्रीय कीर्तनकार तथा आश्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. सुशील महाराज वणवे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते २५ मे २०२६ या कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. यवतमाळ, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या चार जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी शिबिरात उपस्थित राहून विविध संस्कारवर्गीय आणि व्यक्तिमत्त्व विकास विषयक प्रशिक्षण घेतले.

शिबिरामध्ये संगीत, भजन, भाषणकला, श्लोक पठण, ध्यान, प्रार्थना, योगाभ्यास, व्यायाम, योगासने, जुडो-कराटे तसेच वारकरी पाऊली यांसारख्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.

२५ मे रोजी झालेल्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतंजली योगपीठाचे महाराष्ट्र प्रभारी तथा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रल्हादजी सुलताने होते. प्रमुख पाहुणे म्हणून आश्रमाचे उपाध्यक्ष ॲड. वंदनजी कोहाडे, महिला प्रचार विभाग प्रमुख नूतनताई कोहाडे, राष्ट्रधर्म युवा मंचाचे प्रदेश सचिव मनीषजी देशमुख, आश्रम विश्वस्त अंगदराव इतापुरे, श्री गुरुदेव सेवाश्रम अकोल्याचे व्यवस्थापक भानुदासजी कराडे तसेच राष्ट्रीय कीर्तनकार किशोरजी कानडजे महाराज उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गोशाळा पूजन, अधिष्ठान पूजन आणि सामुदायिक प्रार्थनेने झाली. सामुदायिक प्रार्थना व चिंतनाचे मार्गदर्शन राष्ट्रीय कीर्तनकार रामदादा देशमुख यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी "गुरुदेव हमारा प्यारा है, जीवन का उजियारा" हे संकल्पगीत सादर केले.

स्वागतगीत आणि प्रास्ताविक आश्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. सुशील महाराज वणवे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिबिरात घेतलेल्या प्रशिक्षणाचे विविध प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करत संस्कारयुक्त शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच शिबिर यशस्वीपणे पार पाडणाऱ्या प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये गजाननराव ढोके, चतुर्भुज मिटकरी, कुंदन इंगोले, भीमाशंकर शिंब्रे, प्रतीक महाराज गई, सिद्धेश्वर टिकार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेवर मात करत शिबिर यशस्वी करण्यासाठी आश्रम व्यवस्थापन समिती, विश्वस्त मंडळ आणि स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले. यामध्ये मनोहर पाचपोर, गणेशराव जवंजाळ, अतुल उमप, जुगलसेठ राठी, अरुण भागवत, वसंतराव बोराडे, सुधाकर जाधव, कैलास कळमकर, श्रीहरी बजरे, शांताराम घुगे, कृष्णा वणवे, सम्राट पवार, अर्जुन जाधव, ओम फाटे, समर्थ गणगणे, राम बोकडे, विठ्ठल आखुड, डॉ. हरिदास महाराज आखरे, राजेश आखुड, अमोल लांजुळकर, रामेश्वर पाटील, विलासराव मिरगे, विलासराव कराळे, राजेश ठाकरे, श्याम टाले आदींचा सहभाग उल्लेखनीय ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमाचे विश्वस्त मनोहर पाचपोर यांनी केले, तर अतुल उमप यांनी आभार मानले. राष्ट्रवंदनेने शिबिराची सांगता झाली.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0