माझगावमधील गणेश मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’; शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची जनजागृती

माझगाव परिसरातील विविध गणेश मंडळांमध्ये ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमांतर्गत नशामुक्त मुंबई, अन्नातील भेसळ प्रतिबंध, पाणी बचत, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी योजना, महिला कल्याण योजना आणि रोजगार मेळाव्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

Sep 24, 2026 - 23:38
 0  4
माझगावमधील गणेश मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’; शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची जनजागृती
माझगाव गणेश मंडळ, लोकसंवाद २०२६, गणेशोत्सव, शासनाच्या योजना, लोककल्याणकारी योजना, नशामुक्त मुंबई, नशामुक्त महाराष्ट्र, ड्रग्ज फ्री मुंबई, अन्नातील भेसळ, पाणी बचत, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना,

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

मुंबई, दि. २४ : गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि सेवांची माहिती पोहोचविण्यासाठी ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमांतर्गत माझगाव परिसरातील विविध गणेश मंडळांमध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला गणेश मंडळांचे पदाधिकारी, भक्तगण आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

केंद्र शासनाने २०२९ पर्यंत नशामुक्त भारत करण्याचा संकल्प केला असून, त्याअनुषंगाने महाराष्ट्रालाही नशामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘ड्रग्ज फ्री मुंबई, ड्रग्स फ्री महाराष्ट्र’ ही मोहीम राज्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अमली पदार्थांविषयी जनजागृती करण्यासाठी महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात आली.

गणेश मंडळांमध्ये विविध योजनांची माहिती

मुंबई शहरातील विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून माझगाव परिसरातील विविध गणेश मंडळांसमोर नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

यामध्ये ‘नशामुक्त मुंबई, नशामुक्त महाराष्ट्र’, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना, अन्नातील भेसळ प्रतिबंध, पाणी बचत तसेच बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा याबाबत जनजागृती करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

गणेश मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे संस्थापक-अध्यक्ष असलेल्या माझगावमधील अखिल अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंडळाचे सल्लागार सत्यम केसरकर, उपाध्यक्ष दशरथ पवार, कुंडलिक शिंदे, राजाराम कदम, खजिनदार अनिल शिंदे आदींनी नागरिकांना ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष राणे, कार्याध्यक्ष प्रसाद साटम, उपाध्यक्ष स्वप्निल नाईक आणि खजिनदार संकेत आढरकर यांनीही शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मंडळ सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

लव्हलेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मिहीर मयेकर, उपाध्यक्ष गौरव धुरी आणि कार्याध्यक्ष साहिल मुरुडकर यांनी ‘लोकसंवाद’ उपक्रमाला सहकार्य केले.

माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुबोध तोडणकर, उपाध्यक्ष हेमंत मयेकर, मेघा भोईर आणि उपसचिव मेघा चेंडवणकर यांना महिलांसाठीच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनेची माहिती देण्यात आली. पात्र महिलांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

घोडपदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दत्तू थोरात, सल्लागार विजय शिंदे, जयेंद्र जाधव आदींनीही शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यास सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

भेसळ आढळल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन

विभागीय संपर्क अधिकारी किरण वाघ यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने अन्नातील भेसळीबाबत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. अन्नामध्ये भेसळ आढळल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

‘नशामुक्त मुंबई’साठी जनजागृती

विभागीय संपर्क अधिकारी निलेश तायडे यांनी ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाविषयी नागरिकांना माहिती दिली. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी अभियानातील सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद आवळे, उपनिरीक्षक सागर घाडगे, उपनिरीक्षक अस्लम मुजावर आणि त्यांच्या पथकाने अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली.

मुंबईसह महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी न घाबरता टोल फ्री क्रमांक १९३३ वर तसेच जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

पाणी बचतीबाबतही जनजागृती

विभागीय संपर्क अधिकारी गजानन पाटील यांनी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन केले. राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा जपून वापर करण्याची गरज असल्याचे सांगत नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यात आली.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृह योजनांची माहिती

विभागीय संपर्क अधिकारी धोंडिराम अर्जुन आणि इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर कार्यालयाचे विजय तोगरे यांच्या पथकाने इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती, वसतिगृह आदी विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली.

पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याची माहिती

कौशल्य विकास विभागामार्फत २९ सप्टेंबर रोजी राज्यभरात बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईतील १० ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार असून विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. गरजू युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत शासनाच्या योजना, सेवा आणि जनकल्याणकारी उपक्रमांची माहिती देणारा ‘लोकसंवाद २०२६’ हा उपक्रम नागरिकांसाठी माहिती आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.