मुंबईतील गणेशोत्सव मंडळांचा गौरव; सामाजिक, पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रशस्तीपत्रे
मुंबईतील विविध गणेशोत्सव मंडळांना सामाजिक कार्य, पर्यावरणपूरक उपक्रम, कागदी मूर्ती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनजागृतीसाठी प्रशस्तीपत्रे देऊन गौरवण्यात आले.
प्रतिनिधी नरेश शिंदे
मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी) : मुंबईतील गणेशोत्सव मंडळांकडून दरवर्षी धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक, पर्यावरणपूरक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविले जातात. यंदाही विविध गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक विषय, पर्यावरण संवर्धन, कागदी मूर्ती, अन्नधान्य भेसळविरोधी जनजागृती तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक विषयांची मांडणी केली. या उल्लेखनीय उपक्रमांची दखल घेत विविध गणेशोत्सव मंडळांना त्यांच्या विशेष कार्यासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या गौरवामध्ये मुंबईतील विविध भागांतील एकूण १४ गणेशोत्सव मंडळांचा समावेश आहे. प्रत्येक मंडळाने वेगळ्या विषयातून गणेशोत्सवाची सामाजिक आणि जनजागृतीची भूमिका अधोरेखित केली.
विविध विषयांसाठी मंडळांचा गौरव
१. स्त्री शक्ती : गोकुळ नगर सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, दहिसर पूर्व यांना ‘स्त्री शक्ती’ या विषयासाठी प्रशस्तीपत्र देण्यात आले.
२. कागदी मूर्ती : मराठा मित्र मंडळ, जमील नगर, भांडूप पश्चिम यांचा कागदी गणेशमूर्तीच्या उपक्रमासाठी गौरव करण्यात आला.
३. विषयाची योग्य मांडणी : बालविकास मित्र मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव, कांजूर पूर्व यांना विषयाची योग्य मांडणी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले.
४. अन्नधान्य भेसळ जनजागृती : धारावी येथील इलेव्हन इव्हिल्स क्रिकेट क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अन्नधान्य भेसळीविरोधात जनजागृती केल्याबद्दल गौरव प्राप्त केला.
५. सामाजिक कार्य : काळा किल्ला, धारावी येथील श्री हनुमान सेवा मंडळाला सामाजिक कार्यासाठी प्रशस्तीपत्र देण्यात आले.
६. कृत्रिम बुद्धिमत्ता : परळ येथील महादेवाची वाडी ते वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक विषयाची मांडणी केल्याबद्दल गौरव मिळवला.
७. सामाजिक जाणीव : चिंचपोकळी पश्चिम येथील पारशीवाडी मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक जाणीव या विषयासाठी प्रशस्तीपत्र देण्यात आले.
८. पर्यावरणपूरक : करी रोड येथील बालसाथी मित्र मंडळाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी गौरव करण्यात आला.
९. सुबक मूर्ती : ठाकूरद्वार येथील धसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सुबक गणेशमूर्तीसाठी प्रशस्तीपत्र प्राप्त झाले.
१०. सामाजिक कार्य : घाटकोपर पूर्व येथील ‘घाटकोपरचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्ष्मी नारायण बाल गणेश मित्र मंडळाला सामाजिक कार्यासाठी गौरविण्यात आले.
११. उंच कागदी मूर्ती : साकीनाका येथील परेरावाडीच्या ओम श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाला ‘मुंबईचा महाराजाधिराज’ या नावाने साकारलेल्या उंच कागदी मूर्तीसाठी प्रशस्तीपत्र देण्यात आले.
१२. सामाजिक विषय : बोरिवली पश्चिम येथील म्हात्रेवाडीतील श्री साईदर्शन मित्रमंडळाला सामाजिक विषयाच्या मांडणीसाठी गौरविण्यात आले.
१३. उत्कृष्ट रंगसंगती : बोरिवली पश्चिम येथील कस्तुरपार्कमधील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला उत्कृष्ट रंगसंगतीसाठी प्रशस्तीपत्र प्राप्त झाले.
१४. सामाजिक कार्य : दादर येथील हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक कार्यासाठी गौरव करण्यात आला.
भक्तीबरोबर सामाजिक संदेशालाही महत्त्व
मुंबईच्या गणेशोत्सवाची परंपरा ही केवळ धार्मिक उत्सवापुरती मर्यादित नसून सामाजिक संदेश आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणूनही विकसित होत आहे. विविध गणेशोत्सव मंडळांनी आपल्या देखाव्यांमधून आणि उपक्रमांमधून महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव, अन्नधान्य भेसळविरोधी जनजागृती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांसारखे विषय नागरिकांसमोर मांडले.
विशेष म्हणजे काही मंडळांनी पर्यावरणपूरक कागदी मूर्तींचा पर्याय स्वीकारला, तर काही मंडळांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विषय गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवले.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या या गणेशोत्सव मंडळांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव केल्यामुळे मंडळांच्या सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृती यांचा संगम साधणाऱ्या या मंडळांच्या उपक्रमांचे नागरिकांकडूनही कौतुक होत आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0