सोलापूरात संत श्री गजानन महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन; वारकऱ्यांसाठी महापालिकेकडून सर्व सुविधा सज्ज

शेगावहून पंढरपूरकडे जाणाऱ्या संत श्री गजानन महाराज पालखीचे सोलापूर शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले असून वारकऱ्यांसाठी महापालिकेने सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Jul 18, 2026 - 21:24
 0  11
सोलापूरात संत श्री गजानन महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन; वारकऱ्यांसाठी महापालिकेकडून सर्व सुविधा सज्ज
संत श्री गजानन महाराज पालखी, सोलापूर, आषाढी वारी, सोलापूर

सोलापूर प्रतिनिधी: महेंद्र दीक्षित 

सोलापूर : आषाढी वारीनिमित्त शेगावहून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी सोलापूर शहरात टाळ-मृदुंगाच्या गजरात, "गण गण गणात बोते" च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. रूपा भवानी चौक येथे पालखीचे आगमन होताच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल आणि धनश्री कोंड्याल यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून स्वागत करण्यात आले.

यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, शहर सुधारणा सभापती स्वाती बडगु, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, उपायुक्त सोनाली यादव, नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, अविनाश पाटील, नगरसेविका श्रीदेवी फुलारी, राजश्री दोडमनी, श्वेता खरात, माजी नगरसेविका लता फुटाणे, ॲड. विजय मराठे यांच्यासह भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, १८ आणि १९ जुलै रोजी संत श्री गजानन महाराज पालखीचा सोलापूर शहरात मुक्काम असून सुमारे ७०० वारकरी पालखीसोबत सहभागी होत आहेत. वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महानगरपालिकेने सर्व विभागांना सतर्क ठेवत २४ तास सेवा व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

पालखी मार्गावरील रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती करण्यात आली असून संपूर्ण मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. पालखीच्या मुक्कामासाठी कुचन प्रशाला तसेच उपलब्ध मंगल कार्यालयांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा, प्रकाश व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यावेळी महापौर कोंड्याल म्हणाले, "संत श्री गजानन महाराजांची पालखी ही केवळ धार्मिक परंपरा नसून श्रद्धा, सेवा, समता आणि एकात्मतेचा संदेश देणारी प्रेरणादायी परंपरा आहे. सोलापूर शहरात आगमन करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व सुविधायुक्त वातावरण मिळावे, ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधून व्यापक नियोजन करण्यात आले असून स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, प्रकाश व्यवस्था, मुक्काम आणि आपत्कालीन सेवा २४ तास उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. वारकरी हे आपल्या शहराचे मानाचे पाहुणे असून त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे."

यावेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पालखी सोहळ्यादरम्यान शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती दिली. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी वाहतूक सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0