हिंगोलीत बोगस बियाणे आणि कीटकनाशकांविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन; कृषी कार्यालयासमोर पैसे फेकून व्यक्त केला संताप

हिंगोली जिल्ह्यात बोगस बियाणे आणि बोगस जैविक कीटकनाशकांच्या विक्रीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर पैसे फेकून अनोखे आंदोलन केले. दोषींवर तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली.

Jul 16, 2026 - 01:35
 0  42
हिंगोलीत बोगस बियाणे आणि कीटकनाशकांविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन; कृषी कार्यालयासमोर पैसे फेकून व्यक्त केला संताप
हिंगोली, क्रांतिकारी शेतकरी संघटना, बोगस बियाणे, बोगस कीटकनाशके, कृषी विभाग,

हिंगोली | प्रतिनिधी (भगवानराव मस्के)

हिंगोली जिल्ह्यात बोगस बियाणे आणि बोगस जैविक कीटकनाशकांच्या विक्रीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करत कृषी विभागाच्या कथित निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात पैसे फेकून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे आणि जैविक कीटकनाशकांची विक्री सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत आहे. मात्र, याबाबत वारंवार तक्रारी करूनही कृषी विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले, "जर कृषी विभागाला कारवाई करण्यासाठी पैसेच हवेत, तर आम्ही ते द्यायलाही तयार आहोत; पण शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस बियाणे आणि जैविक कीटकनाशक विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे."

यावेळी संघटनेने प्रशासनाला इशारा देत सांगितले की, बोगस कृषी निविष्ठांविरोधात त्वरित आणि कठोर कारवाई झाली नाही, तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मुंबईतील अरबी समुद्रात 'जलसमाधी आंदोलन' छेडले जाईल. अशा परिस्थितीला राज्य सरकार आणि कृषी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, तालुका अध्यक्ष प्रवीण मते, चैतन्य चव्हाण, रमेश जाधव, प्रवीण घुमनार, विशाल पोळ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

दरम्यान, या आंदोलनानंतर बोगस बियाणे व कृषी निविष्ठांच्या विक्रीविरोधात कृषी विभाग कोणती भूमिका घेतो, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1