नाशिकमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती गंभीर; ऑरेंज अलर्ट जारी, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोदावरी नदीला पूर, गंगापूर धरण ९७ टक्के भरले, इगतपुरीत २४० मिमी पावसाची नोंद, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
नाशिक | ब्युरो
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून भारतीय हवामान विभागाने आज सकाळी १० नंतर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पूरस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण प्रशासन हाय अलर्टवर असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. नदीकाठच्या भागात पोलीस आणि महानगरपालिकेच्या पथकांकडून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सतत
सावधगिरीच्या सूचना देण्यात येत आहेत.
दरम्यान, नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके, जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री पूरग्रस्त भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
सराफ बाजारात शिरले पाणी; दुतोंड्या मारुती मंदिर पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे मध्यरात्रीच्या सुमारास गोदावरी नदीला मोठा पूर आला. पूराचे पाणी नाशिकच्या सराफ बाजार परिसरात शिरले. गोदावरी नदीतील पूरमापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुती मंदिराच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचले, तर काही काळ हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले होते.
धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग
जिल्ह्यातील चणकापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच नाशिक शहरातील होळकर ब्रिज परिसरातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर परिसरातूनही गोदावरी नदीमार्गे संभाजीनगरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात सर्वाधिक पाऊस इगतपुरीत
गेल्या २४ तासांत राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली आहे.
इगतपुरी – २४० मिमी
त्र्यंबकेश्वर – २२९ मिमी
नाशिक शहर – १३० मिमी
सततच्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली आहे.
गंगापूर धरण ९७ टक्के भरले
नाशिक शहरासह मराठवाडा आणि अहिल्यानगर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९७ टक्के भरले असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
५५ झाडे कोसळली; उद्योगांना मोठा फटका
वादळी पावसामुळे शहर आणि परिसरात ५५ झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये एक मोठे झाड कोसळून काही वाहनांचे नुकसान झाले.
अंबड औद्योगिक वसाहतीत तब्बल १५ तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने सुमारे ३०० उद्योग ठप्प झाले असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चार घरांच्या भिंती कोसळल्या
नदीकाठच्या काळजी घ्यावी लागणाऱ्या परिसरात चार घरांच्या भिंती कोसळल्या. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर दुखापत झाल्याची नोंद नाही.
प्रशासनाचे आवाहन
प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0