वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य द्यावे; पालकमंत्री गिरीश महाजन

गणेशोत्सवाच्या माध्यमातून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना लोकसहभागाची जोड देऊन ‘हरित नाशिक’चा संकल्प साकारावा, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य द्यावे; पालकमंत्री गिरीश महाजन
Girish Mahajan, Green Nashik, Tree Conservation Nashik, Tree Plantation, Nashik Ganeshotsav, Loksanvad 2026,

नाशिक ब्यूरो 

नाशिक : पर्यावरण संवर्धन आणि ‘हरित नाशिक’ साकारण्यासाठी केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या वृक्षांचे संवर्धन आणि नियमित देखभाल करणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन, कुंभमेळा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना लोकसहभागाची जोड देऊन ‘हरित नाशिक’चा संकल्प साकारावा, असे आवाहन त्यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक आणि इलेक्ट्रॉनिक ॲण्ड डिजिटल मीडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत गणेश महाआरती व पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गणेशाची महाआरती व पूजन करण्यात आले.

गणेशोत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड

गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असून, या उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देणे आवश्यक आहे, असे महाजन यांनी सांगितले.

प्रत्येक गणेश मंडळाने वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि स्वच्छतेचे उपक्रम राबवावेत. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, नैसर्गिक सजावटीचे साहित्य आणि पर्यावरणास अनुकूल उपक्रमांचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.

वृक्षारोपण केल्यानंतर त्याची नियमित देखभाल करून झाड जगविण्याची जबाबदारी स्वीकारणे हीच पर्यावरण संवर्धनाची खरी दिशा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘उन्नत नाशिक’च्या माध्यमातून विकासाला गती

‘उन्नत नाशिक’ अभियानाच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिक, सामाजिक संस्था, गणेश मंडळे आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केल्यास शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविता येतो. वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरण जनजागृतीच्या माध्यमातून ‘हरित कुंभ’ उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले.

‘लोकसंवाद-२०२६’मधून शासनाच्या योजनांची माहिती

‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि लोककल्याणकारी निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांशी थेट संवाद साधून सामाजिक आणि पर्यावरणविषयक संदेश देण्यासोबत शासन व नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे.

नाशिकच्या गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत जतन करण्यासाठी bappa.org हा डिजिटल उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री महाजन यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार गोकुळ गिते, नगरसेविका श्रीमती पांडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे, इलेक्ट्रॉनिक ॲण्ड डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष किरण नाईक, महाराष्ट्र अध्यक्ष सतीश रूपवते, नाशिक जिल्हाध्यक्ष संदीप नवसे यांच्यासह पदाधिकारी आणि गणेशभक्त उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील उपसंपादक प्रवीण बावा, छायाचित्रकार मनोज अहिरे, नवनाथ पालवे, संदेश केदारे, वैभव घुगे, अमोल सोनवणे आदींनी सहकार्य केले.