वर्ध्यातील १२ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी महागावात संताप; आरोपींना फाशीची मागणी
वर्धा जिल्ह्यातील सावंगी (रोठा) येथे १२ वर्षीय आदिवासी चिमुरडीवर कथित अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या प्रकरणाविरोधात यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आदिवासी कृती समितीने आरोपींना कठोर शिक्षा, जलद न्यायालयीन सुनावणी आणि पीडित कुटुंबाला तातडीची मदत देण्याची मागणी केली.
प्रतिनिधी,यवतमाळ : रवी वाघमारे
यवतमाळ : वर्धा जिल्ह्यातील सावंगी (रोठा) येथे १२ वर्षीय आदिवासी चिमुरडीवर कथित अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या प्रकरणाविरोधात यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेचा निषेध करत आदिवासी कृती समिती, महागाव यांच्या वतीने तहसीलदारामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी करून जलदगतीने न्याय मिळावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
समितीच्या निवेदनानुसार, पीडित मुलीचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असून शासनाने त्यांना तातडीची आर्थिक मदत, पुनर्वसन, मोफत कायदेशीर सहाय्य आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तपास निष्पक्ष, वेगवान आणि सर्व संबंधित आरोपींपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
आदिवासी कृती समितीने इशारा दिला की, पीडितेला वेळेत न्याय मिळाला नाही किंवा तपासात दिरंगाई झाली, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
या घटनेमुळे परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण असून, महिलांच्या व बालकांच्या सुरक्षेबाबत अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1