दुष्काळ, नियमित कर्जदार, पीक विमा आणि जमीन हक्कांसाठी किसान सभेचे राज्यभर आंदोलन; मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला इशारा

दुष्काळ, कर्जमाफी, नियमित कर्जदारांना प्रोत्साहन अनुदान, पीक विमा आणि जमीन हक्कांच्या मागण्यांसाठी किसान सभेचे 21 जिल्ह्यांत आंदोलन.

दुष्काळ, नियमित कर्जदार, पीक विमा आणि जमीन हक्कांसाठी किसान सभेचे राज्यभर आंदोलन; मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला इशारा
किसान सभा आंदोलन, महाराष्ट्र शेतकरी आंदोलन, दुष्काळ महाराष्ट्र, शेतकरी कर्जमाफी, नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदान, पीक विमा, जमीन हक्क, शेतकरी प्रश्न, अखिल भारतीय किसान सभा, डॉ. अजित नवले, महाराष्ट्र शेतकरी

नाशिक ब्यूरो:

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत, नियमित कर्जदारांना प्रोत्साहन अनुदान, अटी-शर्तींमुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या कर्जदारांना कर्जमुक्ती, पीक विम्याचे पूर्वीचे ट्रिगर पुन्हा लागू करणे तसेच जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचे हक्क देण्याच्या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आले.

किसान सभेच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये दुष्काळाची तीव्र परिस्थिती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात तातडीने आणि पुरेशी मदत मिळणे आवश्यक आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या संपूर्ण नुकसानीची भरपाई करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.

मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी

किसान सभेने यापूर्वी आझाद मैदान येथे भव्य मोर्चा काढला होता. तसेच 10 ऑगस्ट रोजी राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती.

या बैठकीत नियमित कर्जदारांना दोन लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे किसान सभेने म्हटले आहे. तसेच अटी-शर्तींमुळे वंचित राहिलेल्या कर्जदारांना कर्जमाफी, देवस्थान, इनाम, वर्कस, गायरान आणि वन जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्याची प्रक्रिया तसेच पीक विम्याचे काढून टाकलेले ट्रिगर पुन्हा लागू करण्यासाठी तातडीने प्रक्रिया करण्याबाबत आश्वासने देण्यात आल्याचा दावा किसान सभेने केला आहे.

मात्र, या चर्चेला महिना उलटून गेल्यानंतरही मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप किसान सभेने केला आहे.

‘काजू-बदाम’ देत व्यक्त केला संताप

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या भूमिकेबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोष असल्याचे किसान सभेने म्हटले आहे. दुष्काळ आढावा बैठकींमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप करत किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान सरकारच्या मंत्र्यांना निवेदनासोबत काजू आणि बदाम पाठवून निषेध व्यक्त केला.

या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असा संदेश आंदोलनकर्त्यांनी दिला.

21 जिल्ह्यांमध्ये आंदोलन

अहिल्यानगर, ठाणे, पालघर, बुलढाणा, गडचिरोली, सांगली, पुणे, रायगड, बीड, नांदेड यांसह महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये किसान सभेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शेतकरी कर्जमाफी, नियमित कर्जदारांना प्रोत्साहन अनुदान, पीक विमा, दुष्काळी मदत आणि जमीन हक्क हे प्रमुख मुद्दे मांडण्यात आले.

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाची अधिक परीक्षा न पाहता चर्चेदरम्यान मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे.

मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही किसान सभेच्या वतीने देण्यात आला.

या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, किरण गहला, अर्जुन आडे, शंकर शिडाम, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, अजय बुरांडे, अनिल गायकवाड, उद्धव पौळ, दीपक लिपणे, रामेश्वर पौळ यांच्यासह किसान सभेच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.

– डॉ. अजित नवले

राज्यसचिव, अखिल भारतीय किसान सभा