किल्ले पन्हाळगडावर संविधान दिनानिमित्त स्वच्छता व संवर्धन मोहीम; ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

संविधान दिनानिमित्त किल्ले पन्हाळगडावर ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ मोहिमेचे आयोजन. खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश.

किल्ले पन्हाळगडावर संविधान दिनानिमित्त स्वच्छता व संवर्धन मोहीम; ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
किल्ले पन्हाळगड, संविधान दिन २०२६, गड किल्ले स्वच्छता मोहीम, मानाचा मुजरा हटवूया कचरा, खासदार धैर्यशील माने, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण संवर्धन, ऐतिहासिक वारसा, शिवकालीन किल्ले, पन्हाळा बातमी

प्रतिनिधी : उमेश जाधव 

कोल्हापूर : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी किल्ले पन्हाळगड येथे विशेष स्वच्छता व संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ आणि ‘भारतीय संविधानाचा गौरव व पर्यावरण संरक्षणाचा जागर’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या मोहिमेला नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गड व किल्ले स्वच्छता व संवर्धन मोहिमे’चा प्रारंभ सकाळी ७ वाजता किल्ले पन्हाळगडावर झाला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह समाजकल्याण विभाग, नगरपरिषद प्रशासन विभाग, महसूल विभाग, पर्यटन विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात स्वच्छता मोहीम

या मोहिमेदरम्यान पन्हाळगडावरील ऐतिहासिक सज्जा कोटी, तीन दरवाजा, धान्याचे कोठार यांसह विविध महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व जपण्याबरोबरच गड-किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता राखणे आणि पर्यटकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या स्वच्छता मोहिमेत पन्हाळा विद्यामंदिर, पन्हाळा पब्लिक स्कूल, विक्रम पाटील आणि राजा शिवछत्रपती परिवार, कोल्हापूर यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसह नागरिकांनीही स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा संदेश दिला.

यावेळी सांगलीचे शाहीर देवानंद माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्याने उपस्थितांमध्ये शिवकालीन इतिहासाविषयी अभिमान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन

स्वच्छता मोहिमेनंतर खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या प्रतीला पुष्पांजली वाहण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले.

या कार्यक्रमाला नगराध्यक्षा जयश्री पोवार, सुजितदादा चव्हाण, तहसीलदार माधवी शिंदे, मुख्याधिकारी चेतन माळी, उत्तम कांबळे, समाजकल्याण विभागप्रमुख संजय भोसले, जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य देवेंद्र खराडे व रामेश्वर पत्की, नगरसेविका आडनाईक, गवंडी व मुजावर, भारत चौगले, गोरख लोंढे, इंद्रजीत चौगले आदी मान्यवर उपस्थित होते.

संविधानातील मूल्ये आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

यावेळी मनोगत व्यक्त करताना खासदार धैर्यशील माने यांनी भारतीय संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. संविधानाने दिलेली मूल्ये, समानता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांचा आदर राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून त्याची सुरुवात करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याची आठवण काढत शहीद वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

ऐतिहासिक वारसा जपण्याचे नागरिकांना आवाहन

या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे संरक्षण, स्वच्छता आणि संवर्धन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. गड-किल्ले हा केवळ पर्यटनाचा विषय नसून महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात कचरा न टाकणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि स्वच्छता राखणे यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, सुशिलकुमार शिंदे, क्षेत्र अधिकारी रोहिदास मातकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. या उपक्रमाला नगरपरिषद प्रशासन विभाग, पन्हाळा, पोलीस विभाग, छायाचित्रकार, पत्रकार तसेच इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे निवेदन प्रल्हाद पाटील यांनी केले.

संविधानाचा सन्मान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि पर्यावरण संरक्षण या तीन महत्त्वपूर्ण संकल्पनांचा संगम साधणारी ही मोहीम किल्ले पन्हाळगडाच्या ऐतिहासिक भूमीत उत्साहात संपन्न झाली. ‘गडांचा मान राखूया, संविधानाचा सन्मान करूया आणि स्वच्छतेचा वसा घेऊया’ हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.