मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांनी नागरिकांना प्रोत्साहित करावे – आयुक्त अश्विनी भिडे; २८ व २९ नोव्हेंबरला विशेष शिबिरे
मुंबईतील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी शिबिरांचा लाभ घ्यावा, तसेच राजकीय पक्षांनी जनजागृती करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विनी भिडे यांनी केले.
प्रतिनिधी : देवानंद शिंदे
पात्र मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष सुविधा; ३० नोव्हेंबरपर्यंत गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन, २२ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
मुंबई, दि. २६ नोव्हेंबर : बृहन्मुंबई क्षेत्रातील पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट व्हावीत, यासाठी राजकीय पक्षांनी आपल्या स्तरावर तसेच बूथ लेव्हल एजंट (BLA) यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करावी आणि नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केले आहे.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत पात्र मतदारांच्या सुविधेसाठी येत्या २८ आणि २९ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांचा लाभ घेऊन पात्र नागरिकांनी आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भात मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत आयुक्त अश्विनी भिडे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना ही माहिती देऊन निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन केले.
SIR कार्यक्रमाची अंतिम टप्प्याकडे वाटचाल
माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम व्यापक स्वरूपात आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया २० जून २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे.
या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत गणना प्रपत्रांचे वितरण, संकलन आणि डिजिटायझेशन, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे तसेच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करून त्यास निवडणूक आयोगाची मान्यता मिळविणे या प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत.
प्रारूप मतदार यादीत नावाचा समावेश नसलेल्या पात्र मतदारांसाठी निवडणूक आयोगाने नव्याने गणना प्रपत्र (Enumeration Form) उपलब्ध करून दिले आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत या प्रपत्रांचे वितरण आणि संकलन करण्यात येणार आहे.
२८ आणि २९ नोव्हेंबरला मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे
मतदारांना गणना प्रपत्रासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी संबंधित मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरांमध्ये सहभागी होऊन पात्र मतदारांनी आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत जनजागृती करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध माध्यमांचा वापर करीत आहे.
राजकीय पक्षांनी BLA मार्फत जनजागृती करावी – अश्विनी भिडे
यावेळी बोलताना आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, राजकीय पक्षांच्या सहकार्याने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे काम प्रभावीपणे सुरू आहे. ही संपूर्ण कार्यवाही आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
३० नोव्हेंबरपर्यंत गणना प्रपत्रांचे वितरण आणि संकलन पूर्ण करण्यात येणार असून, मतदारांच्या सोयीसाठी २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी विशेष शिबिरे आयोजित केली आहेत. प्रशासनाकडून विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
मात्र, या प्रक्रियेत राजकीय पक्षांची भूमिकाही महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या स्तरावर तसेच बूथ लेव्हल एजंट (BLA) यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी. विशेष शिबिरांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे आणि पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
२२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
प्रक्रिया अंतिम तारीख
गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन ३० नोव्हेंबर २०२६
गणना प्रपत्रे निकाली काढण्याची प्रक्रिया १० डिसेंबर २०२६
दावे व हरकती निकाली काढणे १५ डिसेंबर २०२६
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध २२ डिसेंबर २०२६
वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित
या बैठकीला अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (कर निर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार यांच्यासह विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत झालेल्या कामकाजाची आणि पुढील नियोजनाची सविस्तर माहिती देण्यात आली.
मतदार यादीतील नाव हा लोकशाही प्रक्रियेतील सहभागाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी आयोजित विशेष शिबिरांचा लाभ घेऊन मतदार यादीतील नावासंदर्भातील कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.