पिंपरीतील म्हाडाच्या ४० वर्षे जुन्या वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; ९४१ कुटुंबांना मिळणार ९२५ ते १२२५ चौ. फुटांची घरे!

पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील म्हाडाच्या ४० वर्षे जुन्या वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या प्रयत्नांमुळे ९४१ कुटुंबांना ९२५ ते १२२५ चौ. फुटांची नवीन घरे मिळण्याचा मार्ग खुला झाला असून रहिवाशांचे ३० ते ३२ कोटी रुपयांचे संभाव्य आर्थिक नुकसानही टळले आहे.

पिंपरीतील म्हाडाच्या ४० वर्षे जुन्या वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; ९४१ कुटुंबांना मिळणार ९२५ ते १२२५ चौ. फुटांची घरे!
म्हाडा पुनर्विकास, संत तुकाराम नगर पिंपरी, म्हाडा पिंपरी, ९४१ कुटुंबे, यशवंतभाऊ भोसले, संत तुकाराम नगर पुनर्विकास, पिंपरी चिंचवड बातम्या, ४० वर्षे जुनी वसाहत, ९२५ चौ. फूट घर, १२२५ चौ. फूट घर, कन्व्हेन्स डीड, म्हाडा गृहनिर्माण योजना, MHADA

प्रतिनिधी: रोहन सोनाळे 

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या दीड वर्षांच्या प्रयत्नांना यश; रहिवाशांचे ३० ते ३२ कोटी रुपयांचे संभाव्य आर्थिक नुकसान टळले

पिंपरी / संत तुकाराम नगर (प्रतिनिधी) : पिंपरी येथील संत तुकाराम नगरमधील म्हाडाच्या सुमारे ४० वर्षे जुन्या आणि जीर्ण झालेल्या वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या पुनर्विकासामुळे ९४१ सदनिकाधारक कुटुंबांना सुमारे ९२५ ते १२२५ चौरस फुटांची प्रशस्त घरे मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. विशेष म्हणजे, पुनर्विकासाच्या प्रक्रियेत रहिवाशांवर पडू शकणारा सुमारे ३० ते ३२ कोटी रुपयांचा आर्थिक भारही शासनाच्या विविध सवलती आणि योजनांच्या माध्यमातून टाळण्यात यश आले आहे. कामगार नेते तथा संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्थेचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांच्या दीड वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश आल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्था मर्यादित आणि संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीय दीपावली उत्सव व दीप महोत्सवाच्या निमित्ताने मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) संस्थेच्या वाटचालीचा आणि पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. संत तुकाराम महाराज सभामंडप येथे आयोजित या कार्यक्रमात ९४१ सदनिकाधारक आणि २३ दुकानदारांसमोर अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी पुनर्विकासासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती दिली.

यावेळी माजी खासदार अमर साबळे, नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक सचिन साठे, माजी नगरसेवक बबनराव गाढवे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती दत्तात्रय गणपतराव धाडगे, नंदू आप्पा कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सचिन साठे यांचा स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच गाळेधारकांनी गायनाच्या कार्यक्रमाचा आनंद घेत दीपोत्सव साजरा केला.

१९८५ पासून वास्तव्यास; चार दशकांनंतर पुनर्विकासाला गती

यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले की, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात म्हाडाच्या जागेवर संत तुकाराम नगरमध्ये ९४१ सदनिका आणि २३ दुकाने आहेत. बजाज, टेल्को, महिंद्रा यांसह विविध लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारा श्रमिक वर्ग १९८५ पासून या वसाहतीत वास्तव्यास आहे.

मात्र, गेल्या चार दशकांत इमारतींची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. घरांमधील वॉशरूममधून गळती, पावसाळ्यात छत गळणे, छताचे भाग कोसळणे आणि इमारतींच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेली भीती यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या वसाहतीचा पुनर्विकास व्हावा, अशी मागणी रहिवाशांकडून सातत्याने केली जात होती.

म्हाडाकडून पुनर्विकासाची प्रतीक्षा करण्याऐवजी नव्या कायद्यातील तरतुदींचा लाभ घेऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करीत पुनर्विकासासाठी स्वतः पुढाकार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्व ९४१ सदनिकाधारकांना एकत्र आणून दीड वर्षांच्या कालावधीत कन्व्हेन्स डीड प्रक्रियेसाठी अर्ज, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि विविध शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या.

या प्रयत्नांना यश मिळत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी आणि सोसायटी अध्यक्ष यांच्यात हस्तांतरणासंदर्भातील कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती यशवंतभाऊ भोसले यांनी दिली. ही घोषणा होताच उपस्थित रहिवाशांनी टाळ्यांचा कडकडाट करीत आणि फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

शासनाच्या सवलतींमुळे ३० ते ३२ कोटींचा आर्थिक भार टळला

या पुनर्विकास प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा अडथळा आर्थिक बाबींचा होता. सुमारे ७० टक्के सदनिकाधारकांच्या भुईभाडे, मुद्रांक शुल्क, अकृषक कर (एन.ए. कर), हस्तांतरण शुल्क आदींची मिळून सुमारे ३० ते ३२ कोटी रुपयांची रक्कम म्हाडाकडे देय असल्याने हस्तांतरण प्रक्रियेत अडचणी निर्माण होत होत्या.

मात्र, शासनाच्या विविध सवलती आणि योजनांचा लाभ मिळवून हा आर्थिक भार सर्वसामान्य सदनिकाधारकांवर पडू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. अकृषक कर, मुद्रांक शुल्क आणि भुईभाडे यासंदर्भात जुन्या दरांचा लाभ मिळाल्याने रहिवाशांचे अंदाजे ३० ते ३२ कोटी रुपयांचे संभाव्य आर्थिक नुकसान टळल्याचा दावा यशवंतभाऊ भोसले यांनी केला.

या कामी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.

१९८ चौ. फुटांच्या घराऐवजी ९२५ चौ. फुटांचे २ बीएचके!

पुनर्विकासानंतर रहिवाशांना मिळणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळाबाबतही यशवंतभाऊ भोसले यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यानुसार, सध्या १८० ते १९८ चौरस फुटांच्या सदनिकांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना सुमारे ९०० ते ९२५ चौरस फुटांचे दोन बीएचके घर मिळणार आहे. तर २८० चौरस फुटांच्या सदनिकाधारकांना सुमारे १२०० ते १२२५ चौरस फुटांचे घर मिळणार आहे.

अनेक बांधकाम व्यावसायिकांनी सुरुवातीला पुनर्विकासाच्या प्रस्तावाबाबत अनुकूल भूमिका घेतली नव्हती. मात्र, सर्वसामान्य श्रमिक कुटुंबांना मोठ्या आणि आधुनिक घरांचा लाभ मिळावा, यासाठी यशवंतभाऊ भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे लहान सदनिकांमध्ये अनेक वर्षे राहणाऱ्या कुटुंबांना आता प्रशस्त घराचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

साडेतीन वर्षांत नव्या घरांमध्ये स्थलांतराची अपेक्षा

पुनर्विकासासाठी ९२५ आणि १२२५ चौरस फुटांच्या घरांचा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रकल्पाशी संबंधित प्रलंबित आर्थिक बाबींवरही बांधकाम व्यावसायिकाच्या सहभागातून मार्ग काढण्यात आला आहे. कन्व्हेन्स डीडवर स्वाक्षऱ्या झाल्या असून, प्रॉपर्टी कार्डवर सोसायटीचे नाव नोंद झाल्यानंतर रहिवाशांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकल्पाची अधिकृत माहिती दिली जाणार आहे.

जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर पुढील साडेतीन वर्षांत रहिवाशांचे नव्या घरांमध्ये स्थलांतर होईल, अशी अपेक्षा यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केली. तसेच पुनर्विकासाच्या कामावर शासनाने नियमित देखरेख आणि तपासणी करावी. निविदेनुसार मंजूर झालेल्या सुविधा आणि जागा प्रत्यक्षात रहिवाशांना मिळत आहेत की नाही, याची खात्री करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

९४१ घरे महिलांच्या नावावर करण्याची अमर साबळे यांची सूचना

या कार्यक्रमात माजी खासदार अमर साबळे यांनी यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. संत तुकाराम नगरच्या पुनर्विकासासाठी त्यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी असल्याचे सांगत, ९४१ कुटुंबांच्या घरांचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे त्यांनी नमूद केले.

संस्थेतील सर्वधर्मीय एकता, सामूहिक ताकद आणि रहिवाशांची एकजूट हे राष्ट्रीय एकात्मतेचे आदर्श उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले. पुनर्विकासानंतर मिळणारी सर्व ९४१ घरे महिलांच्या नावावर करण्याचा ठराव संस्थेने करावा, अशी सूचना त्यांनी केली. तसेच भविष्यात या पुनर्विकसित प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणण्याची जबाबदारी स्वीकारत त्यांनी रहिवाशांचे अभिनंदन केले.

सचिन साठे यांच्याकडून रहिवाशांचे अभिनंदन

नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक सचिन साठे यांनीही संत तुकाराम नगरमधील ९४१ सदनिका आणि २३ दुकानांच्या पुनर्विकासासाठी यशवंतभाऊ भोसले आणि रहिवाशांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

यशवंतभाऊ भोसले हे संकटांवर मात करणारे आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. चार दशकांपासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना आता सुरक्षित आणि आधुनिक घरे मिळणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. नव्या इमारती पुढील ४०० वर्षे टिकाव्यात, अशी संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करत सामान्य नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रश्नांसाठी सदैव मदतीला उभे राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

सर्वधर्मीय एकतेतून दीपोत्सव उत्साहात

कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष ओंकारजी झोकारे, कार्याध्यक्ष अंकुशजी वाघमारे, सरचिटणीस अप्पुकुट्टन नारायण नायर, खजिनदार मानसीताई देशपांडे, इस्मत सुलताना सैयद, फौजदार शंकरराव गायकवाड, विनायकराव निकम, सुदामराव गायकवाड, मल्लेजी कोरवी, अंकुशराव गायकवाड, आप्पासाहेब माने, राजारामजी भोंडवे, शालिनताई महापुरे, रावसाहेबजी पावळे, गणेशजी गुलदगड, अरुणाताई भंडारी, आरतीताई पराळे, झेवियर अँथनी, शंकरराव शितोळे, सतीशराव सासवड, मनोज नांदे, सुधाकर कान्होजी शिंदे, संतोषीताई चौधरी, राजेंद्रजी पाटील, शहनाजजी नासीर मौलवी, शिरीषजी सासवडे, योगेंद्रजी आरवडे, किसनजी भाग्यवंत, हेमंतजी जाधव, दत्तात्रय झरकर, लताताई पाटील, कैलासराव गव्हाणे, महेशजी भुते, दगडू लोंढे, नंदकिशोर जोशी, दत्तात्रय शिंदे, उषाताई टाकळकर, चंद्रकांत भालेराव, सनाताई शेख, श्रेयसजी करे यांच्यासह संस्थेचे सल्लागार, संचालक आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू आप्पा कदम यांनी सूत्रसंचालन केले. मनोज नांदे यांनी प्रास्ताविक केले, तर राहुल शितोळे यांनी आभार मानले. युवा नेते दीपक शेठ पाटील, अमोलजी घोरपडे, राष्ट्रीय श्रमिक विद्यार्थी युवा आघाडीचे दिनेशभाऊ पाटील आणि राहुल शितोळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर पुनर्विकासाच्या दिशेने पडलेले हे पाऊल संत तुकाराम नगरमधील ९४१ कुटुंबांसाठी नव्या आशेचा किरण ठरले आहे.