कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिल वाचले; वीज वाहिनीचा मार्ग बदलण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश

कामशेतच्या पॅराग्लायडिंग हिलला प्रस्तावित वीज वाहिनीमुळे निर्माण होणारा धोका टळला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वीज वाहिनीचा मार्ग बदलण्याचे आदेश दिले.

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिल वाचले; वीज वाहिनीचा मार्ग बदलण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश
कामशेत पॅराग्लायडिंग, श्रीरंग बारणे, कामशेत पॅराग्लायडिंग हिल, टॉवर हिल, वीज वाहिनी मार्ग बदल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मावळ पर्यटन, पॅराग्लायडिंग महाराष्ट्र, साहसी पर्यटन, कामशेत पर्यटन

प्रतिनिधी : रोहन सोनाळे 

खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; ३० वर्षांपासून सुरू असलेला साहसी क्रीडा प्रकार कायम राहणार

मावळ : कामशेतमधील प्रसिद्ध पॅराग्लायडिंग हिलला प्रस्तावित वीज वाहिनीमुळे निर्माण होणारा धोका अखेर टळला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, वीज वाहिनीचा मार्ग बदलण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे कामशेतमधील गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेला पॅराग्लायडिंग साहसी क्रीडा प्रकार सुरक्षितपणे सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रस्तावित विद्युत वाहिनीमुळे पॅराग्लायडिंगच्या उड्डाण क्षेत्रात निर्माण होणाऱ्या अडथळ्यांबाबत चर्चा करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत पॅराग्लायडिंग खेळाला अडथळा निर्माण होऊ नये, वीज वाहिनीचा मार्ग बदलण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बैठकीला कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनचे अध्यक्ष संजय एम. राव, उपाध्यक्ष विनोद शेलार तसेच विद्युत वाहिनीचे काम करणाऱ्या अदानी पॉवरचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय विद्युत मंत्रालयाकडे खासदार बारणे यांचा पाठपुरावा

कामशेत परिसरात प्रस्तावित वीज वाहिनीचे खांब उभारल्यास पॅराग्लायडिंग हिलच्या मुख्य उड्डाण क्षेत्राला अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. यामुळे कामशेत पॅराग्लायडिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन वीज वाहिनीचा मार्ग बदलण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेत खासदार बारणे यांनी केंद्रीय विद्युत मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल यांची भेट घेतली. केवळ तीन विद्युत खांबांसाठी गेल्या ३० वर्षांपासून विकसित झालेला आणि सुरू असलेला पॅराग्लायडिंगचा क्रीडा प्रकार बंद करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्युत खांब पर्यायी मार्गाने उभारणे शक्य असल्याने वीज वाहिनीचा मार्ग बदलण्याबाबत त्यांनी आग्रह धरला.

यावर केंद्रीय विद्युत मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल यांनी संबंधित खासगी कंपनीशी चर्चा करून फेरसर्व्हे करण्याचे आणि विद्युत खांब उड्डाण क्षेत्राला अडथळा होणार नाही अशा बाजूने हलविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही वीज वाहिनीचा मार्ग बदलण्याचे आदेश दिल्याने या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघाला आहे.

देश-विदेशातील पर्यटकांसाठी महत्त्वाचे साहसी पर्यटन केंद्र

कामशेत येथील ‘टॉवर हिल’ हे भारतातील पॅराग्लायडिंगसाठी महत्त्वाचे ठिकाण असून, दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक आणि शेकडो प्रशिक्षणार्थी पायलट येथे भेट देतात. मनोरंजनात्मक उड्डाणे, व्यावसायिक टँडम फ्लाइट्स, वैमानिक प्रशिक्षण आणि स्पर्धात्मक विमान क्रीडा उपक्रमांमुळे या ठिकाणाला राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केलेल्या पायलटनीही याच ठिकाणी प्रशिक्षण घेतले असून, कामशेतने भारतातील पॅराग्लायडिंग समुदायाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सप्टेंबर ते मार्च या पूर्वेकडील वाऱ्यांच्या हंगामात येथे उड्डाणांसाठी अनुकूल परिस्थिती असते. या कालावधीत टॉवर हिल हे उड्डाणांसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र ठरते.

पर्यटनासोबत स्थानिक रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार

कामशेतमधील पॅराग्लायडिंग पर्यटनावर स्थानिक वाहतूकदार, होमस्टे व्यावसायिक, कॅफे, रेस्टॉरंट्स, पर्यटन मार्गदर्शक आणि विविध सेवा व्यवसाय अवलंबून आहेत. या साहसी पर्यटनामुळे परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि स्थानिक नागरिकांसाठी रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण होतात.

प्रस्तावित विद्युत वाहिनीचा मार्ग मुख्य उड्डाण क्षेत्रातून जाणार असल्याने पॅराग्लायडिंगच्या सुरक्षिततेवर तसेच पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता मार्ग बदलण्याच्या आदेशामुळे पर्यटन व्यावसायिक, पायलट, प्रशिक्षणार्थी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

३० वर्षांचा पॅराग्लायडिंग वारसा कायम

कामशेत हे गेल्या तीन दशकांपासून भारतातील प्रमुख पॅराग्लायडिंग स्थळ म्हणून ओळखले जाते. येथील भौगोलिक स्थान, डोंगररचना, उंची आणि अनुकूल वाऱ्यांची परिस्थिती यामुळे वर्षातील जवळपास आठ ते नऊ महिने उड्डाणासाठी संधी उपलब्ध होते. देशभरातील वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठीही हे महत्त्वाचे केंद्र आहे.

पॅराग्लायडिंगच्या सुरक्षित उड्डाण पद्धती विकसित करणे, वैमानिक घडवणे आणि भारतातील विमान क्रीडा समुदाय विस्तारण्यात कामशेतने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वीज वाहिनीचा मार्ग बदलण्याच्या निर्णयामुळे या साहसी क्रीडा स्थळाचे अस्तित्व कायम राहणार असून, मावळच्या पर्यटन क्षेत्राला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्यामुळे कामशेतच्या पॅराग्लायडिंग हिलला बाधा आणणारा प्रश्न मार्गी लागल्याने साहसी पर्यटन क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.