नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी प्रगणना उत्साहात; ६,२१५ पक्ष्यांची नोंद, ११० सायकलस्वारांची पर्यावरण जनजागृती रॅली
महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात पावसाळापूर्व पक्षी प्रगणना उत्साहात पार पडली. या प्रगणनेत ६० हून अधिक पक्षी प्रजातींसह एकूण ६,२१५ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ११० सायकलस्वारांनी नाशिक ते नांदूर मध्यमेश्वर अशी जनजागृती रॅलीही काढली.
नाशिक ब्यूरो |
महाराष्ट्राचे 'भरतपूर' तसेच जागतिक दर्जाचे रामसर स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात रविवारी (२८ जून २०२६) पावसाळापूर्व पक्षी प्रगणना उत्साहात पार पडली. अभयारण्यातील जैवविविधतेचा अभ्यास, स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींची अचूक नोंद आणि पक्षी संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने वन विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ७.३० ते ९.३० या कालावधीत झालेल्या पक्षी प्रगणनेत विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, पक्षीमित्र, स्थानिक नागरिक तसेच नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
११० सायकलस्वारांची पर्यावरण जनजागृती रॅली
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे नाशिक ते नांदूर मध्यमेश्वर अशी भव्य सायकल रॅली. नाशिक सायकलिस्ट आणि नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीचे नेतृत्व अमित घुगे यांनी केले. सुमारे ११० सायकलस्वारांनी सहभाग घेत पर्यावरण संरक्षण, प्रदूषणमुक्त जीवनशैली आणि पक्षी संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आयोजन
ही पक्षी प्रगणना उपवनसंरक्षक (वन्यजीव) कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
६० हून अधिक प्रजाती, ६,२१५ पक्ष्यांची नोंद
यंदाच्या प्रगणनेत ६० हून अधिक पक्षी प्रजाती आढळून आल्या. चित्रबलाक (Painted Stork), चमचा (Eurasian Spoonbill), हळदीकुंकू बदक (Spot-billed Duck), जांभळी पाणकोंबडी (Purple Swamphen), गडवाल (Gadwall), हळद्या (Golden Oriole), राखी बगळा (Grey Heron), सुगरण (Baya Weaver), उघड्या चोचीचा करकोचा (Asian Openbill), शेराटी (Glossy Ibis), पांढऱ्या मानेचा करकोचा (Woolly-necked Stork), लहान पाणकावळा (Little Cormorant), कपाशी घार (Black-winged Kite), खंड्या (Kingfisher), बिटर्न (Bittern), नदीसुराय (River Tern), वारकरी (Common Coot) आणि कापशी बदक यांसारख्या विविध पक्ष्यांची नोंद करण्यात आली.
पक्षी संख्या
पाणथळ पक्षी (Waterbirds): ४,७७८
झाडांवरील पक्षी (Terrestrial Birds): १,४३७
एकूण नोंदवलेले पक्षी: ६,२१५
पक्षीमित्र आणि वन कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग
या प्रगणनेत वन कर्मचारी, वन्यजीव रक्षक, संरक्षण मजूर, निसर्ग मार्गदर्शक (नेचर गाईड्स) आणि अनेक पक्षीमित्रांनी सहभाग घेतला. क्षेत्रीय समन्वय, माहिती संकलन आणि पक्षी निरीक्षणामध्ये स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
वर्षभर पक्षीनिरीक्षणाची संधी
वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी सांगितले की, "यंदाच्या प्रगणनेत नोंदविलेली पक्ष्यांची संख्या आणि प्रजातींची विविधता ही गेल्या वर्षभरात अभयारण्यात करण्यात आलेल्या अधिवास संवर्धन आणि संरक्षणाच्या कामाचे यश आहे. आता नांदूर मध्यमेश्वर येथे केवळ हंगामी नव्हे, तर वर्षभर पक्षी दर्शन होत असून पक्षीप्रेमींनी अभयारण्याला अवश्य भेट द्यावी."
वन विभागाच्या मते, पक्षी संवर्धन, गोदावरी-कडवा नदीकाठच्या जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0