अल्पवयीन मुलाला फसवून सोन्याची चेन लंपास करणारा सराईत गुन्हेगार अटकेत; खार पोलिसांची शंभर टक्के रिकव्हरी
मुंबईतील खार परिसरात अल्पवयीन मुलाला सोन्याची बॅट देण्याचे आमिष दाखवून ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन घेऊन पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला खार पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला असून १०० टक्के रिकव्हरी करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई : खार पोलीस ठाण्याच्या पथकाने अल्पवयीन मुलाला फसवून सोन्याची चेन घेऊन पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात यश मिळवले आहे. आरोपीकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणात शंभर टक्के रिकव्हरी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७४/२०२६, कलम ३१८(२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुरज विक्रम बनसोडे उर्फ सुर्या उर्फ राजेश (वय ३८) असे असून तो माटुंगा येथील आंबेडकर रोड परिसरातील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता फिर्यादी आणि त्यांचा मित्र यश हे खारदांडा परिसरात उभे असताना आरोपी त्यांच्याकडे आला. एअरटेल कंपनीची छत्री लावण्यासाठी ८०० रुपये देतो, असे आमिष दाखवून आरोपीने त्यांना खळा मैदानाजवळील बसस्थानकाच्या मागील भागात नेले.
तेथे आरोपीने अल्पवयीन मुलाच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाची आणि अंदाजे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी घेऊन त्यामध्ये सोन्याची बॅट बसवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर साखळी हातात घेत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढला. आरोपी टाटा पॉवर हाऊस, धारावी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर २३ जून २०२६ रोजी त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणात चोरीस गेलेली मालमत्ता पूर्णपणे हस्तगत करण्यात आली असून न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक वैभव काटकर (गुन्हे), सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत कुंभारे तसेच तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0