पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६ मध्ये महाराष्ट्राची बाजी; पाच राष्ट्रीय पुरस्कारांसह कर्जवितरणात देशात प्रथम क्रमांक

पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६ मध्ये महाराष्ट्राला पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पथविक्रेत्यांना कर्जवितरणात राज्याने देशात प्रथम, तर डिजिटल व्यवहारांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६ मध्ये महाराष्ट्राची बाजी; पाच राष्ट्रीय पुरस्कारांसह कर्जवितरणात देशात प्रथम क्रमांक
पीएम स्वनिधी पुरस्कार २०२६, महाराष्ट्र पाच पुरस्कार, पीएम स्वनिधी योजना, पथविक्रेता कर्ज योजना, महाराष्ट्र

प्रतिनिधी: देवानंद शिंदे 

मुंबई : पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना संस्थात्मक कर्जपुरवठ्याच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पीएम स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 'पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६' मध्ये महाराष्ट्राने तब्बल पाच राष्ट्रीय पुरस्कार पटकावले असून, कर्जवितरणात देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याशिवाय डिजिटल व्यवहारांच्या अवलंबनात राज्याने द्वितीय क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे.

या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र शासनाला दोन पुरस्कार, तर राज्यातील तीन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे.

नवी दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा गौरव

नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६ चा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्यमंत्री मनोहर लाल आणि केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू यांच्या हस्ते महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याला पीएम स्वनिधी योजनेंतर्गत कर्जवितरणात देशात प्रथम क्रमांकाचा, तर डिजिटल व्यवहारांच्या अवलंबनात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. पथविक्रेत्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासोबतच डिजिटल आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या राज्याच्या प्रयत्नांना या पुरस्कारांच्या माध्यमातून राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.

परभणी, परळी आणि छत्रपती संभाजीनगरचाही गौरव

राज्य शासनाच्या पुरस्कारांसोबतच महाराष्ट्रातील तीन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनीही राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

परभणी महानगरपालिका : एक ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत कर्जवितरणात प्रथम क्रमांक.

परळी नगरपरिषद : एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत कर्जवितरणात प्रथम क्रमांक.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका : दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत कर्जवितरणात तृतीय क्रमांक.

या तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या शहरी विकास आणि पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळाले आहे.

समन्वित प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला यश

पीएम स्वनिधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन, नगरविकास विभाग, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, विविध नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, बँकिंग क्षेत्रातील संस्था आणि इतर संबंधित घटकांनी समन्वयाने काम केले.

या यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे पथविक्रेत्यांपर्यंत संस्थात्मक कर्जसुविधा पोहोचविणे शक्य झाले. विशेषतः छोट्या व्यावसायिकांना आर्थिक आधार देणे, त्यांच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देणे आणि डिजिटल व्यवहारांची सवय निर्माण करणे यावर भर देण्यात आला.

काय आहे पीएम स्वनिधी योजना?

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अर्थात पीएम स्वनिधी ही केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने जून २०२० मध्ये या योजनेची सुरुवात केली.

या योजनेचा मुख्य उद्देश रस्त्यावरील विक्रेते, फेरीवाले आणि छोट्या व्यावसायिकांना कोणत्याही तारणाशिवाय परवडणारे खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. व्यवसाय पुन्हा उभा करणे, आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवणे आणि उत्पन्नाच्या संधी वाढविणे यासाठी या योजनेचा लाभ दिला जातो.

मार्च २०३० पर्यंत योजनेचा विस्तार

सप्टेंबर २०२५ मध्ये पीएम स्वनिधी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची पुनर्रचना करण्यात आली असून, योजनेची मुदत मार्च २०३० पर्यंत वाढविण्यात आली आहे. या विस्तारित योजनेत केवळ कर्जपुरवठाच नव्हे, तर पथविक्रेत्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्यावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

या योजनेत पुढील महत्त्वाच्या सुविधांचा समावेश आहे.

वाढीव कर्ज टप्पे : पथविक्रेत्यांना व्यवसायाच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने कर्जसुविधा.

रुपे क्रेडिट कार्ड : यूपीआयशी संलग्न रुपे क्रेडिट कार्डची सुविधा.

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन : डिजिटल पेमेंटचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहनपर लाभ.

सामाजिक सुरक्षा : 'स्वनिधी से समृद्धी' उपक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडणी.

नोंदणी व ओळख : पथविक्रेत्यांची ओळख निश्चित करून त्यांची नोंदणी.

कौशल्य विकास : क्षमता विकास आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीला चालना.

पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

शहरी अर्थव्यवस्थेत पथविक्रेत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शहरांमधील लाखो नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या छोट्या व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे.

पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६ मध्ये महाराष्ट्राने मिळविलेले पाच राष्ट्रीय पुरस्कार हे राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि बँकिंग क्षेत्राच्या समन्वित प्रयत्नांचे फलित मानले जात आहे. कर्जवितरणातील प्रथम क्रमांक आणि डिजिटल व्यवहारांमधील द्वितीय क्रमांकामुळे महाराष्ट्राच्या कामगिरीला राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यापुढेही पथविक्रेत्यांना सुलभ कर्जसुविधा, डिजिटल आर्थिक व्यवहारांची साधने आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.