राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांच्या सिबिलवर कर्जमाफीची टांगती तलवार; बँकांना स्पष्ट निर्देश देण्याची मागणी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वन टाइम सेटलमेंट पद्धतीने झाल्यास राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांच्या सिबिल गुणांकनावर विपरीत परिणाम होण्याची भीती क्रांतिकारी शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे.
हिंगोली | प्रतिनिधी : भगवानराव मस्के
राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’ अंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत पीक कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र, या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी वन टाइम सेटलमेंट (OTS) पद्धतीने होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांच्या सिबिल (CIBIL) गुणांकनावर विपरीत परिणाम होण्याची भीती क्रांतिकारी शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे.
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कर्जमाफी योजनेंतर्गत सरकारकडून संपूर्ण कर्जाची रक्कम न भरता काही रक्कम शासनाकडून देण्यात येणार असून, उर्वरित रक्कम संबंधित बँकांनी माफ करायची असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया वन टाइम सेटलमेंट पद्धतीने राबविण्यात आल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची नोंद ‘OTS’ म्हणून होण्याची शक्यता आहे.
कर्जाची नोंद ‘वन टाइम सेटलमेंट’ म्हणून झाल्यास भविष्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज, वाहन कर्ज, गृहकर्ज तसेच इतर बँकिंग सुविधा मिळविताना अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळूनही भविष्यात शेतकऱ्यांच्या आर्थिक पतक्षमतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या गंभीर प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. सरकारने तातडीने सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी आणि खासगी बँकांना स्पष्ट लेखी आदेश देऊन या कर्जमाफी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअरवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, याची हमी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, सरकारने कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दिला असला, तरी त्याच निर्णयामुळे भविष्यात शेतकऱ्यांची पत खराब होणार असेल, तर ही बाब अन्यायकारक ठरेल. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या कोणत्याही शेतकऱ्याच्या सिबिल अहवालात नकारात्मक नोंद होणार नाही, याबाबत तातडीने शासन निर्णय काढून बँकांना बंधनकारक सूचना देण्यात याव्यात.
राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक व्यवहारांशी संबंधित हा महत्त्वाचा विषय असल्याने सरकारने याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सरकारने या विषयावर लवकरात लवकर स्पष्टीकरण दिले नाही, तर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करेल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.