रसायनी पोलिसांची धाडसी कामगिरी; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एसटी बसमधील ८ प्रवाशांची सुखरूप सुटका
रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे सारसई येथील कर्जत–पेण मार्गावर पुराच्या पाण्यात अडकलेल्या एसटी बसमधील आठ प्रवाशांची रसायनी पोलिसांनी हेल्प फाउंडेशन रसायनीच्या सहकार्याने यशस्वी सुटका केली. ७२ वर्षीय वृद्ध महिलेला पोलीस कर्मचाऱ्याने खांद्यावर घेऊन सुरक्षितस्थळी पोहोचवल्याने पोलिसांच्या सेवाभावाचे दर्शन घडले.
रायगड | प्रतिनिधी दिपक शिंदे
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सारसई येथील कर्जत–पेण मार्गावर पुराचे पाणी साचल्याने एक एसटी बस अडकून पडली. या बसमधील आठ प्रवाशांची रसायनी पोलिसांनी हेल्प फाउंडेशन, रसायनी यांच्या सहकार्याने धाडसी बचाव मोहीम राबवत सुखरूप सुटका केली.
पूराचे पाणी वेगाने वाढत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच रसायनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि हेल्प फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले. नियोजनबद्ध आणि तत्पर कारवाईमुळे सर्व आठ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
या बचाव मोहिमेदरम्यान ७२ वर्षीय ज्येष्ठ महिला चालण्यास असमर्थ असल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना आपल्या खांद्यावर उचलून पुराच्या पाण्यातून सुरक्षित स्थळी पोहोचविले. या संवेदनशील आणि सेवाभावी कृतीमुळे उपस्थित नागरिकांनी पोलिसांचे विशेष कौतुक केले.
रसायनी पोलिसांच्या धाडसी आणि कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि मानवतेची भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0