पालखी मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विश्रांतवाडी ते फुलेनगर बीआरटी हटविण्याला मंजुरी
आळंदी-पुणे पालखी महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर रोडदरम्यानचा बीआरटी मार्ग हटविण्याला स्थायी समिती आणि महापालिका आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात विश्रांतवाडी चौक ते परुळेकर शाळा (शांतीनगर) दरम्यान ५०० मीटरचा बीआरटी मार्ग हटविण्यात आला आहे.
पुणे | प्रतिनिधी रोहन सोनाळे
आळंदी-पुणे पालखी महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करून पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुरळीत करण्याच्या उद्देशाने विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर रोडदरम्यानचा बीआरटी (बस रॅपिड ट्रान्झिट) मार्ग हटविण्याच्या प्रस्तावाला पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी मिळाली असून महापालिका आयुक्तांनीही त्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर रोड या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या बीआरटी मार्गावर एकूण सहा बीआरटी बस स्थानकांचा समावेश आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात वाहतूक कोंडीची समस्या अधिक असलेल्या विश्रांतवाडी चौक ते परुळेकर शाळा (शांतीनगर) या सुमारे ५०० मीटर अंतरावरील बीआरटी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
या कामांतर्गत साठे बिस्कीट बीआरटी बस स्थानक हटविण्यात आले असून, दोन्ही बाजूंचे सुमारे २५० मीटर लांबीचे आरसीसी लेन सेपरेटर, ७५० मीटर लांबीचे लोखंडी ग्रील सेपरेटर तसेच ३५ मीटर लांबी व ४ मीटर रुंदीचे बीआरटी बस स्थानक काढण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत उर्वरित बीआरटी मार्ग हटविण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पालखी मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून, वारकरी, नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुणे महापालिकेने पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, बीआरटी हटविण्याचा निर्णय हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0