केवळ पदे घेऊ नका, पदाला न्याय द्या; संघटना मजबूत करा – उदय सामंत

पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केवळ पदे घेऊन न थांबता संघटनात्मक बांधणी मजबूत करावी, पदाला न्याय द्यावा आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काम करावे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठकीत सांगितले.

केवळ पदे घेऊ नका, पदाला न्याय द्या; संघटना मजबूत करा – उदय सामंत
उदय सामंत, शिवसेना, पिंपरी चिंचवड शिवसेना, शिवसेना आढावा बैठक, सचिन अहिर, श्रीरंग बारणे, एकनाथ शिंदे, शिवसेना

प्रतिनिधी: रोहन सोनाळे 

केवळ पदे घेऊ नका, पदाला न्याय द्या; संघटना मजबूत करा – उदय सामंत

पिंपरी-चिंचवड : शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी केवळ पदे घेऊन आणि पदाचे कार्ड छापून थांबू नये, तर आपल्या पदाला न्याय देत संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर द्यावा. पदांचा दुरुपयोग खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी दिला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करावे, असेही त्यांनी निर्देश दिले.

पिंपरी-चिंचवड शिवसेनेची पदाधिकारी आढावा बैठक नुकतीच थेरगाव येथे पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा, आगामी निवडणुकांची तयारी, मतदारयादी पुनर्रचना आणि नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्यांना संघटनेत सामावून घेण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीला विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, शिवसेनेचे उपनेते व खासदार श्रीरंग बारणे, महापालिकेतील गटनेते विश्वजित बारणे, महिला उपनेत्या व नगरसेविका सुलभा उबाळे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, जिल्हा संघटक बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख व नगरसेवक निलेश तरस, जिल्हा संघटिका शीला भोंडवे, शहर संघटिका सरिता साने, महानगरप्रमुख राजेश फलके, युवासेना प्रमुख सागर पाचारणे, मावळ तालुकाप्रमुख रामभाऊ सावंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख सायली साळवी, युवासेना शहरप्रमुख चेतन बेंद्रे, चिंचवड विधानसभा प्रमुख बापू काटले, भोसरी विधानसभा प्रमुख गणेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर भर

उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. शाखाप्रमुख ते शहरप्रमुख अशा प्रत्येक पदाची जबाबदारी निश्चित करून पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात सक्रिय राहावे. संघटनेत नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य संधी देऊन त्यांना संघटनात्मक कामात सामावून घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात सध्या २१ विधानसभा मतदारसंघ असून भविष्यात मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ही संख्या २९ किंवा ३० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही मतदारसंघ वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागावे. संभाव्य उमेदवार डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक काम करावे आणि भविष्यात वाढणाऱ्या जागांवर शिवसेनेचे प्रतिनिधित्व असावे, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली.

लोकसभा मतदारसंघांची संख्याही भविष्यात वाढण्याची शक्यता असून, पुणे जिल्ह्यात शिवसेनेने अशी ताकद निर्माण करावी की भविष्यातील राजकीय निर्णयप्रक्रियेत पक्षाला महत्त्वाचे स्थान मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

सरकारचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात प्रबळपणे काम करत असून, सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत आहे. हे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी पार पाडावी, असे उदय सामंत यांनी सांगितले.

केवळ सत्तेतील पक्ष म्हणून काम न करता जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे. पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना सत्तेत नसली, तरी नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घ्यावी. जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करणे हीच संघटनेची ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील नागरिकांना मदतीचे आवाहन

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत उदय सामंत यांनी शिवसैनिकांनी पर्यटन किंवा इतर कारणांसाठी बाहेर जाण्यापेक्षा दुष्काळग्रस्त मराठवाड्यात जाऊन नागरिकांना मदत करावी, असे आवाहन केले.

मराठवाड्यातून शिक्षणासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड येथे आलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत करणे ही सामाजिक जबाबदारी असून, शिवसैनिकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

मतदारयादी पुनर्रचनेचे काम सुरू असताना कोणताही पात्र मतदार यादीतून वगळला जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढीस मोठा वाव – सचिन अहिर

विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी पुणे जिल्ह्यात शिवसेनेच्या वाढीस मोठा वाव असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, “मला आणि उदय सामंत यांना पुणे जिल्ह्याचा चांगला अनुभव आहे. गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहता या भागात शिवसेना अधिक चांगल्या प्रकारे वाढू शकते. कोण पुढे गेला, यापेक्षा आपण संघटनेचे काम प्रामाणिकपणे करत राहिलो, तर आपली स्थिती नक्कीच मजबूत राहील.”

कार्यकर्त्यांना बळ देणे आणि त्यांना संघटनात्मक कामासाठी प्रोत्साहित करणे ही आपली जबाबदारी असल्याचेही अहिर यांनी स्पष्ट केले.

जनतेच्या प्रश्नांवर शिवसेना रस्त्यावर उतरणार

शिवसेनेकडे विविध पक्षांतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा ओढा वाढत असून, पक्षात प्रवेश करणाऱ्यांना नेत्यांनी योग्य बळ दिले पाहिजे. राज्य आणि केंद्रात सत्तेत असतानाही पिंपरी-चिंचवडमध्ये पक्ष सत्तेत नसल्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमकपणे काम करावे, असे बैठकीत सांगण्यात आले.

निगडीतील रस्ते अरुंद करणाऱ्या हरित सेतू प्रकल्पाविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. मोशी येथील दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

तसेच, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पिंपरी-चिंचवडमधील प्राधिकरणाच्या साडेबारा टक्के परताव्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

महिला पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कामाबाबत सुलभा उबाळे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्ताविक शहरप्रमुख निलेश तरस यांनी केले, तर युवासेना प्रमुख सागर पाचारणे यांनी आभार मानले.