पिंपरी-चिंचवडला जागतिक क्रीडा नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी ‘पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन’; १० जानेवारी २०२७ रोजी आयोजन
महानगरपालिकेच्या वतीने १० जानेवारी २०२७ रोजी पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. ४२, २१, १० आणि ५ किलोमीटर अशा विविध धावण्याच्या गटांचा समावेश असून, शहराला जागतिक क्रीडा क्षेत्रात ओळख मिळवून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
प्रतिनिधी : रोहन सोनाळे
४२, २१, १० आणि ५ किलोमीटरच्या धाव स्पर्धा; शहरात क्रीडा संस्कृती रुजविण्यासह आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न
पिंपरी, दि. १९ नोव्हेंबर २०२६ : औद्योगिक नगरी म्हणून देशभरात ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला आता जागतिक क्रीडा नकाशावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने येत्या १० जानेवारी २०२७ रोजी ‘पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन’ आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत ४२ किलोमीटर फुल मॅरेथॉन, २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा विविध धावण्याच्या गटांचा समावेश असणार आहे.
शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य, फिटनेस आणि व्यायामाबाबत जागरूकता निर्माण करणे, स्थानिक धावपटूंना प्रोत्साहन देणे तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंना स्पर्धेचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. याबाबत महापौर रवि लांडगे यांनी शहराला क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
मॅरेथॉनच्या आयोजनासाठी अशा मोठ्या स्पर्धांचा अनुभव असलेल्या संस्थेची मदत घेतली जाणार आहे. स्पर्धेची नोंदणी, व्यवस्थापन, नियोजन आणि अन्य व्यवस्था आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात येणार असून, ‘पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉन’चा जागतिक मॅरेथॉन कॅलेंडरमध्ये समावेश व्हावा, यासाठीही महापालिकेच्या वतीने विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
औद्योगिक शहराची क्रीडा क्षेत्रातही जागतिक ओळख निर्माण करणार
महापौर रवि लांडगे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराने औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीमुळे देशभरात आपली ओळख निर्माण केली आहे. आता क्रीडा क्षेत्रातही शहराला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉनच्या माध्यमातून शहरातील तरुणाई आणि नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा मिळेल.
देश-विदेशातील धावपटूंना आकर्षित करणारी ही स्पर्धा शहराच्या लौकिकात भर घालणारी ठरेल. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही महापौरांनी केले.
सर्व वयोगटांतील धावपटूंना सहभागाची संधी
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉनचे आयोजन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियोजनानुसार करण्यात येणार आहे. ४२, २१, १० आणि ५ किलोमीटर अशा विविध गटांमुळे अनुभवी धावपटूंसह नवोदित, तरुण आणि फिटनेसप्रेमी नागरिकांनाही स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेचा जागतिक मॅरेथॉन कॅलेंडरमध्ये समावेश व्हावा, यासाठी आवश्यक प्रयत्न केले जाणार आहेत. शहरात क्रीडा संस्कृती रुजविणे, नागरिकांचे आरोग्य उत्तम राखणे आणि पिंपरी-चिंचवडला आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ओळख मिळवून देणे हा या आयोजनामागील प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत मान्यवरांची उपस्थिती
पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉनच्या आयोजनासंदर्भात महापौर रवि लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, क्रीडा समिती सभापती कैलास कुटे यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
पीसीएमसी ग्रँड मॅरेथॉनच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात धावण्याची संस्कृती, आरोग्यविषयक जागरूकता आणि क्रीडा सहभाग वाढण्यास चालना मिळणार असून, शहराच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमेला नवी उंची मिळवून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.