सीएचएमई भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये एआय, मशीन लर्निंग, डेटा सायन्स आणि एमएस्सी मीडिया स्टडीजचे नवे अभ्यासक्रम सुरू

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून बीएस्सी (एआय अँड मशीन लर्निंग), बीएस्सी (डेटा सायन्स) आणि एमएस्सी मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज हे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

Jul 3, 2026 - 16:25
 0  10
सीएचएमई भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये एआय, मशीन लर्निंग, डेटा सायन्स आणि एमएस्सी मीडिया स्टडीजचे नवे अभ्यासक्रम सुरू
भोसला मिलिटरी कॉलेज, सीएचएमई, AI and Machine Learning,

नाशिक | ब्यूरो 

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (सीएचएमई)च्या भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून आधुनिक तंत्रज्ञान आणि माध्यम क्षेत्राशी संबंधित तीन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. बीएस्सी (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग), बीएस्सी (डेटा सायन्स) तसेच एमएस्सी मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज या अभ्यासक्रमांना राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाची मान्यता मिळाली आहे.

राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नवीन अभ्यासक्रम, विषय, अतिरिक्त तुकड्या आणि विद्याशाखांना मान्यता देण्याबाबत परिपत्रक जारी केले असून त्यामध्ये भोसला मिलिटरी कॉलेजचा समावेश आहे.

सैनिकी शिक्षणासाठी देशभरात ओळख असलेल्या भोसला मिलिटरी कॉलेजने बदलत्या तंत्रज्ञानाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख आणि आधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग तसेच डेटा सायन्स हे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

याशिवाय एमएस्सी मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज हा पदव्युत्तर अभ्यासक्रमही महाविद्यालयात सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा अभ्यासक्रम यापूर्वी केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकविला जात होता. विद्यापीठाबाहेर हा अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळणारे भोसला मिलिटरी कॉलेज हे पहिले आणि एकमेव महाविद्यालय ठरले आहे.

महाविद्यालयात यापूर्वी एमए जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन (एमए-जेएमसी) हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या एमएस्सी मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीजमध्ये दिग्दर्शन, पटकथा लेखन, चित्रपट निर्मिती, सिनेमॅटोग्राफी, साऊंड डिझाइन, कॅमेरा तंत्रज्ञान, माध्यम व्यवस्थापन आणि सोशल मीडिया मार्केटिंग यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

सुमारे अडीच महिन्यांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाची पाहणी करून आवश्यक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि पायाभूत व्यवस्था तपासली होती. समितीच्या सकारात्मक शिफारशीनंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या अभ्यासक्रमांना अंतिम मान्यता दिली.

महाविद्यालयाच्या मते, या नवीन अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण आणि मीडिया क्षेत्रात करिअरच्या व्यापक संधी उपलब्ध होणार आहेत.

अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थी, पालक आणि प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भोसला मिलिटरी कॉलेजशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्था आणि महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0