इडा पिडा जावो, बळीचे राज्य येवो’; भाटगावच्या शाळेच्या दर्शनी फलकावर बैलपोळ्याचा सुंदर संदेश
नाशिकच्या भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या दर्शनी फलकावर कलाशिक्षक श्री. देव हिरे यांनी बैलपोळ्यानिमित्त सुंदर फलक रेखाटन केले. ‘इडा पिडा जावो, बळीचे राज्य येवो’ या संदेशातून शेतकरी आणि बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
नाशिक ब्यूरो:
‘सण मातीचा, इमानी साथीचा...!’ फलक रेखाटनातून शेतकरी आणि बैलाप्रती कृतज्ञता
नाशिक : ‘इडा पिडा जावो, बळीचे राज्य येवो’, ‘सण मातीचा, इमानी साथीचा...!’ या भावस्पर्शी संदेशातून बैलपोळा सणाचे महत्त्व अधोरेखित करणारे सुंदर फलक रेखाटन नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव येथील दर्शनी फलकावर करण्यात आले आहे.
विद्यालयाचे कलाशिक्षक श्री. देव हिरे यांनी बैलपोळ्यानिमित्त हे आकर्षक फलक रेखाटन साकारले असून, त्यातून भारतीय कृषिप्रधान संस्कृतीतील शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नाते प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस
भारतीय कृषिप्रधान संस्कृतीत हजारो वर्षांपासून शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतात शेतकऱ्यासोबत राबणारा बैल हा केवळ पशू नसून शेतकऱ्याचा सारथी, मित्र, सखा, सोबती आणि इमानी सहकारी म्हणून ओळखला जातो.
बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या सर्जा-राजाला अंघोळ घालून त्याला झुल, घंटी, घुंगरू, फुलमाळा, फुगे आणि विविध रंगांनी सजवतात. त्यानंतर पुरणपोळीचा गोड नैवेद्य अर्पण करून त्याच्या चरणी नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त केली जाते.
शेतकरी आणि बैल यांच्यातील या भावनिक नात्याचे दर्शन घडविणारा बैलपोळा हा महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि कृषी संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे.
‘शेतात सोनं उगवण्याची’ प्रेरणा
बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकरी आपल्या सर्जा-राजाच्या साथीने पुन्हा नव्या जोमाने शेतीच्या कामाला सुरुवात करण्याची प्रेरणा घेतो. अस्मानी आणि सुलतानी संकटांना सामोरे जात असताना शेतकऱ्याच्या अविरत परिश्रमाला आणि घामाने पिकवलेल्या पिकाला योग्य दाम मिळावा, हीच बळीराजाची अपेक्षा असते.
‘इडा पिडा जावो, बळीचे राज्य येवो’ या पारंपरिक शुभेच्छा संदेशातून शेतकरी सुखी, समृद्ध आणि संपन्न व्हावा, अशी मंगलकामना व्यक्त करण्यात आली आहे.
कलाशिक्षक देव हिरे यांचा अभिनव उपक्रम
बैलपोळ्याच्या पार्श्वभूमीवर कलाशिक्षक श्री. देव हिरे यांनी नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगावच्या दर्शनी फलकावर साकारलेल्या या रेखाटनातून विद्यार्थ्यांसह नागरिकांना शेतकरी, बैल आणि कृषी संस्कृतीचे महत्त्व समजावून देण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे.
फलक रेखाटनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.
‘इडा पिडा जावो, बळीचे राज्य येवो!’
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0