पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात महापालिकेची धडक कारवाई; आकाशचिन्ह व परवाना विभागाची मोहीम सुरू
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात आकाशचिन्ह व परवाना विभागाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
प्रतिनिधी : रोहन सोनाळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत धडक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहराचे सौंदर्य अबाधित राखण्याबरोबरच महापालिकेच्या महसुलाचे संरक्षण करण्यासाठी अनधिकृत जाहिरात फलकांची स्थळ पाहणी करून ते तातडीने निष्कासित करण्यात येत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर हे देशपातळीवर औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. शहराचा नियोजित विकास होत असून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक व खासगी जागांवरील अनधिकृत जाहिरात फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण होऊ नये, यासाठी महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील नियम २४४ व २४५ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका (आकाशचिन्ह व स्कायसाईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन व नियंत्रण नियम, २०२२ अंतर्गत संबंधित तरतुदींनुसार खासगी जागेतही जाहिरात फलक उभारण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
मात्र, महापालिकेची आवश्यक परवानगी न घेता शहराच्या विविध भागांत जाहिरात फलक उभारले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा अनधिकृत जाहिरात फलकांमुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होण्याबरोबरच महापालिकेच्या जाहिरात महसुलातही घट होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत शहरातील जाहिरात फलकांची स्थळ पाहणी करण्यात येत आहे. पाहणीदरम्यान आवश्यक परवानगी नसलेले किंवा नियमांचे उल्लंघन करणारे जाहिरात फलक आढळल्यास संबंधित फलकांवर निष्कासनाची कारवाई केली जात आहे.
महापालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेचा उद्देश शहरातील जाहिरात फलकांचे नियमन करणे, अनधिकृत फलकांना प्रतिबंध करणे, शहराचे सौंदर्य आणि सुरक्षितता अबाधित राखणे तसेच महापालिकेच्या महसुलात वाढ करणे हा आहे.
मागील महिन्यामध्ये ताथवडे परिसरातही अनधिकृत जाहिरात फलकांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने दिली आहे. शहरातील इतर भागांतही स्थळ पाहणी आणि आवश्यकतेनुसार निष्कासनाची कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे.
महापालिका हद्दीत जाहिरात फलक उभारणाऱ्या जाहिरातदारांनी आणि जागामालकांनी महापालिकेची पूर्वपरवानगी घेऊनच जाहिरात फलक उभारावेत, तसेच संबंधित नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0