महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवानिमित्त भव्य सांस्कृतिक सोहळा; कला, संस्कृती, खाद्यपरंपरा आणि हस्तकलेचा अनोखा संगम

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात १४ ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. मराठी नाट्य, लावणी, गझल, भरतनाट्यम, लाईव्ह कॉन्सर्टसह खाद्य, हस्तकला आणि वस्त्रपरंपरेचे विशेष आकर्षण.

Sep 10, 2026 - 02:54
 0  18
महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवानिमित्त भव्य सांस्कृतिक सोहळा; कला, संस्कृती, खाद्यपरंपरा आणि हस्तकलेचा अनोखा संगम
महाराष्ट्र सदन गणेशोत्सव 2026, दिल्ली गणेशोत्सव, महाराष्ट्र सदन दिल्ली, गणेशोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम,

प्रतिनिधी : देवानंद शिंदे 

नवी दिल्ली, दि. ९ : राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात यंदाचा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणासोबतच महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती, खाद्यपरंपरा, वस्त्रपरंपरा आणि हस्तकलेचे दर्शन घडविणाऱ्या विविध कार्यक्रमांनी रंगणार आहे.

निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, हा या उत्सवामागील प्रमुख उद्देश आहे.

दररोज महाआरती; मिरवणुकीने गणेशोत्सवाची सुरुवात

गणेशोत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची महाआरती होणार आहे.

१४ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी १० वाजता श्रींची मिरवणूक, सकाळी ११ वाजता प्राणप्रतिष्ठा, तर सायंकाळी ७ वाजता जुन्या महाराष्ट्र सदनात भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मराठी नाट्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

१५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत संसद मार्गावरील आकाशवाणी रंगभवन येथे भरत जाधव व अन्य कलाकारांचा गाजलेला मराठी नाट्यप्रयोग ‘पुन्हा सही रे सही’ सादर होणार आहे.

१६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता जुन्या महाराष्ट्र सदनात ‘नितीन सरकटे हंसराज’ लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे.

१७ सप्टेंबर रोजी आकाशवाणी रंगभवन येथे वैभव जोशी आणि संदीप खरे यांचा ‘मराठी चित्रपट गीते’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर १८ सप्टेंबर रोजी संतोष भांगरे प्रस्तुत ‘महाराष्ट्राची लोककला’ हा कार्यक्रम होणार आहे.

१९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत श्री सत्यनारायण पूजा आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला असून, सायंकाळी ६.३० वाजता जुन्या महाराष्ट्र सदनात गझल नवाज भीमराव पांचाळे यांचा मराठी गझल कार्यक्रम रंगणार आहे.

२० सप्टेंबर रोजी जनपथ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर येथे वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे, शरयू दाते आणि अन्य गायकांचा ‘मराठी चित्रपट गीते’ हा कार्यक्रम होणार आहे.

पाककला स्पर्धेपासून ‘खेळ पैठणीचा’पर्यंत विविध कार्यक्रम

२१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता ‘पाक कलाकृती’ स्पर्धा, तर सायंकाळी ६.३० वाजता साध्वी जेठवानी सादरीकृत ‘भरत नाट्यम’ कार्यक्रम जुन्या महाराष्ट्र सदनात होणार आहे.

२२ सप्टेंबर रोजी राजेंद्र क्षीरसागर सादरकर्ते असलेला ‘खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

२३ सप्टेंबर रोजी आकाशवाणी रंगभवन येथे प्रमिला लोदगेकर प्रस्तुत ‘लावणी’ कार्यक्रम होणार आहे. २४ सप्टेंबर रोजी जुन्या महाराष्ट्र सदनात मोनिका कपूर प्रस्तुत ‘बॉली बीट्स’ या हिंदी-मराठी गायन आणि नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवातील खास आकर्षणे

यंदाच्या गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृती, हस्तकला आणि वस्त्रपरंपरेची विशेष झलक पाहायला मिळणार आहे.

‘चव महाराष्ट्राची!’ – पुरणपोळी आणि उकडीच्या मोदकांचा लाईव्ह स्टॉल

‘चव महाराष्ट्राची!’ या उपक्रमांतर्गत पुरणपोळी आणि उकडीचे मोदक बनविण्याचा लाईव्ह स्टॉल हे गणेशोत्सवातील खास आकर्षण ठरणार आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव दिल्लीकरांना यानिमित्ताने घेता येणार आहे.

‘कौशल्याला सलाम!’ – दिव्यांग कलाकारांच्या कलावस्तूंचे प्रदर्शन

‘कौशल्याला सलाम!’ या उपक्रमातून दिव्यांग बांधवांनी आपल्या कौशल्याने आणि प्रेमाने साकारलेल्या विविध कलावस्तूंचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमातून दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा संदेश दिला जाणार आहे.

पैठणीसह महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचे दर्शन

‘महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा अनोखा ठेवा!’ या उपक्रमातून पैठणी, इंदुरी, माहेश्वरी, इरकल साड्या तसेच विविध हस्तमाग वस्तूंची आकर्षक मांडणी करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर ‘खरेदीची पर्वणी!’ अंतर्गत विविध आकर्षक स्टॉल्स, हस्तकला आणि वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची मेजवानी गणेशभक्त आणि दिल्लीकरांना अनुभवता येणार आहे.

त्यामुळे यंदाच्या महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सवात चव, संस्कृती, कला, परंपरा आणि खरेदीचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे.

२५ सप्टेंबरला भव्य विसर्जन मिरवणूक

गणेशोत्सवाची सांगता २५ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. दुपारी ३ ते सायंकाळी ७.३० या वेळेत जुन्या महाराष्ट्र सदनातून झांज पथकासह श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.

सर्व कार्यक्रम विनामूल्य

उत्सवातील सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. मात्र १५, १७, १८, २० आणि २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे.

दिल्लीतील नागरिक, महाराष्ट्रप्रेमी तसेच गणेशभक्तांनी या गणेशोत्सवातील विविध धार्मिक, सांस्कृतिक, कलात्मक आणि खाद्यपरंपरांशी संबंधित कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.