मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नवी दिल्ली दौरा; पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांशी महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, मेट्रो, महामार्ग आणि पर्यावरण मंजुरीसह विविध प्रकल्पांना गती देण्याबाबत चर्चा केली.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
नवी दिल्ली, दि. १७ : महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना अधिक गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय पर्यावरण, वन व हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. या भेटींमध्ये राज्यातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रकल्प तसेच केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध विकासकामांची सद्यस्थिती, केंद्राच्या सहकार्याने सुरू असलेले प्रकल्प आणि प्रलंबित प्रकल्पांबाबत माहिती दिली. राज्यातील विविध प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक असलेल्या सहकार्याबाबतचे पत्रही त्यांनी पंतप्रधानांना दिले.
या बैठकीत महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसेच उत्तन-विरार कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर चर्चा झाली.
पुणे मेट्रो-३च्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांना निमंत्रण
पुणे मेट्रो-३ प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या या प्रकल्पाच्या चाचण्या सुरू आहेत. टाटा समूहाच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही देशातील नवीन धोरणांतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी पद्धतीची पहिली मेट्रो असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पुणे मेट्रो-३ प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना निमंत्रण दिले.
पंतप्रधानांसोबतची भेट अत्यंत सकारात्मक आणि फलदायी झाली. यापूर्वीही महाराष्ट्राने विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडे सहकार्य मागितले असता केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याच धर्तीवर राज्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्याने अधिक गती देण्याचा प्रयत्न या दिल्ली दौऱ्यात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
उत्तन-विरार कॉरिडॉरसाठी निधी उभारणीवर चर्चा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबई-वाढवण एक्स्प्रेसवे कनेक्टिव्हिटी अर्थात उत्तन-विरार कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर विशेष चर्चा झाली.
सुमारे ५५ हजार कोटी रुपयांच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी अर्थात जायका (JICA) मार्फत वित्तीय सहाय्य मिळविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने सादर केला आहे.
प्रकल्पाचा मोठा आर्थिक आवाका लक्षात घेता, जायकासोबत आणखी एखाद्या बहुपक्षीय वित्तीय संस्थेला सहभागी करून संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारता येईल का, याबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सकारात्मक पर्याय सुचविला.
महाराष्ट्र शासनाने या पर्यायाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुढील काळात संबंधित वित्तीय संस्थांशी समन्वय साधून प्रस्ताव पुढे नेण्यात येणार आहे. त्यामुळे उत्तन-विरार कॉरिडॉरच्या वित्तीय व्यवस्थेबाबत नवा मार्ग उपलब्ध झाला असून प्रकल्पाला गती देण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
पर्यावरण व वन मंजुरीसाठी केंद्राकडे पाठपुरावा
केंद्रीय पर्यावरण, वन व हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांचीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेण्यात आला.
विविध प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या मंजुरी कोणत्या टप्प्यावर आहेत, याबाबतची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिली. मंजुरी प्रक्रियेमुळे विकासकामांना विलंब होऊ नये, यासाठी संबंधित प्रस्तावांचा जलदगतीने निपटारा करण्याची विनंती करण्यात आली.
याबाबत केंद्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून संबंधित प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वन मंजुरीच्या प्रस्तावांना गती देण्याचे आश्वासन देण्यात आले.
महाराष्ट्राच्या विकास प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्याने गती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि दळणवळण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः उत्तन-विरार कॉरिडॉरच्या निधी उभारणीचा मार्ग, पुणे मेट्रो-३च्या उद्घाटनाची तयारी आणि विविध प्रकल्पांच्या पर्यावरण व वन मंजुरी याबाबत झालेल्या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0