महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता; भव्य मिरवणुकीने गणरायास निरोप
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात १२ दिवसांच्या गणेशोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून गणरायाला निरोप देण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रतिनिधी: नरेश शिंदे
नवी दिल्ली, दि. २५ (प्रतिनिधी) : राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात १४ सप्टेंबरपासून उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची काल दिमाखात सांगता झाली. रात्री श्री गणेशमूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. बारा दिवस चाललेल्या या उत्सवाच्या माध्यमातून राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक, कलात्मक आणि धार्मिक परंपरा अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळाली.
ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक
गणेश विसर्जनाच्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात जुन्या महाराष्ट्र सदनातून झाली. विसर्जनापूर्वी निवासी आयुक्त गुंतवणूक सुशील गायकवाड यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. आरतीनंतर झांज पथक आणि ढोल-ताशांच्या गजरात श्रींच्या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात जुन्या महाराष्ट्र सदनातून नव्या महाराष्ट्र सदनापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत दिल्लीतील नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले. ढोल-ताशांच्या तालावर उत्साहाने सहभागी झालेल्या गणेशभक्तांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय झाला.
मिरवणूक नव्या महाराष्ट्र सदनात पोहोचल्यानंतर गणेशभक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर विहित धार्मिक विधी पूर्ण करून श्री गणेशमूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली गणेशोत्सवाची पर्वणी
बारा दिवसांच्या या गणेशोत्सवात दररोज सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची महाआरती करण्यात आली. १४ सप्टेंबर रोजी श्रींची प्राणप्रतिष्ठा, आगमन मिरवणूक आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याशिवाय आकाशवाणी रंगभवन तसेच जुन्या महाराष्ट्र सदनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रख्यात अभिनेते भरत जाधव यांचे ‘पुन्हा सही रे सही’ हे नाटक, नितीन सरकटे हंसराज यांची लाईव्ह कॉन्सर्ट, वैभव जोशी व संदीप खरे यांचा ‘मराठी चित्रपट गीते’ कार्यक्रम, संतोष भांगरे यांचा ‘महाराष्ट्राची लोककला’ कार्यक्रम आणि गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझल कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यासोबतच वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे आणि शरयू दाते यांच्या गायन कार्यक्रमांनीही रसिकांची दाद मिळवली. भरतनाट्यम, लावणी, ‘खेळ पैठणीचा’ आणि ‘बॉली बीट्स’ यांसारख्या कार्यक्रमांनी गणेशोत्सवाची रंगत आणखी वाढवली. १९ सप्टेंबर रोजी श्री सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या खाद्य व वस्त्रसंस्कृतीचे दर्शन
‘चव महाराष्ट्राची!’ या उपक्रमांतर्गत पुरणपोळी आणि उकडीचे मोदक यांचे लाईव्ह स्टॉल उभारण्यात आले. त्यामुळे दिल्लीकरांना महाराष्ट्रातील पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता आला.
‘कौशल्याला सलाम!’ या उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या कलावस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. तसेच ‘महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा अनोखा ठेवा!’ या उपक्रमातून पैठणी, इंदुरी, माहेश्वरी, इरकल साड्या तसेच विविध हस्तमाग वस्तूंची मांडणी करण्यात आली.
विविध खाद्यपदार्थ, हस्तकला आणि पारंपरिक वस्तूंच्या स्टॉल्समुळे दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृती, हस्तकला आणि वस्त्रपरंपरेचा जवळून अनुभव घेता आला.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा राजधानीत जागर
गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी नागरिक, कलाकार, स्वयंसेवक, संस्था आणि आयोजन समितीचे आभार मानले.
दिल्लीतील नागरिक तसेच महाराष्ट्रप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाचा महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सव भक्ती, कला, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा सुंदर संगम ठरला. विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचविण्यात आली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0