आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा गणेश विसर्जन सोहळ्यात उत्साहाने सहभाग; गिरगाव चौपाटीवर अनुभवली महाराष्ट्राच्या संस्कृतीची जादू

गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन सोहळ्यात २३ देशांतील आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी उत्साहाने सहभाग घेतला. परदेशी पर्यटकांनी गणरायाची आरती, पूजा आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात सहभागी होत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेतला.

Sep 27, 2026 - 22:08
 0  15
आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा गणेश विसर्जन सोहळ्यात उत्साहाने सहभाग; गिरगाव चौपाटीवर अनुभवली महाराष्ट्राच्या संस्कृतीची जादू
गणेश विसर्जन, गिरगाव चौपाटी, आंतरराष्ट्रीय पर्यटक, महाराष्ट्र पर्यटन, गणेशोत्सव, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, पर्यटन विभाग, परदेशी पर्यटक,

प्रतिनिधी: देवानंद शिंदे 

मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या गणेश विसर्जन सोहळ्याला यंदा आंतरराष्ट्रीय पर्यटकांची विशेष उपस्थिती लाभली. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आयोजित गणेश विसर्जन सोहळ्यात जगभरातील २३ देशांमधील पर्यटक आणि पाहुण्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा, भक्तिमय वातावरण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परदेशी पर्यटकही भारावून गेले.

अनंत चतुर्दशीनिमित्त आयोजित या सोहळ्याच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरगाव चौपाटीवरील महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या विशेष दालनाला भेट दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या या दालनाला भेट दिल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या सहभागाबाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटन विभागाने केलेल्या आयोजनाचे कौतुक केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, बृहन्मुंबईच्या महापौर रितू तावडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांच्यासह अनेक परदेशी पर्यटक उपस्थित होते.

गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्यउत्सव आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाने या उत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले. आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी मोठ्या उत्साहाने गणेश विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला. विशेषतः येथील वातावरण आणि नियोजन पाहून ते भारावून गेले.”

हजारो नागरिक एकत्र आल्यानंतरही शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेला गणेश विसर्जन सोहळा पाहणे हा आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आनंदाचा क्षण ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

परदेशी पर्यटकांनी केली गणपती बाप्पाची आरती

गणेश विसर्जनाचा भव्य सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी विविध देशांमधील पर्यटक गिरगाव चौपाटीवर उपस्थित होते. थायलंडमधून आलेल्या पर्यटकांनी गणरायाची आरती करत भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला.

पर्यटकांना गणेश मिरवणुकीची भव्यता जवळून पाहण्यासोबतच गणरायाची पूजा, आरती आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात सहभागी होण्याची संधी मिळाली. अनेक परदेशी पर्यटक पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषेत सहभागी झाले. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेतला.

‘हा उत्सव श्रद्धा, एकता आणि आनंदाचा संगम’

इटलीहून आलेले पर्यटक मार्को यांनी या अनुभवाबद्दल सांगितले की, हा सोहळा प्रथमच अनुभवताना श्रद्धा, एकता आणि आनंदाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. लाखो नागरिक एकाच स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करताना पाहणे हा भावनिक अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.

फिनलँडहून आलेल्या जॉना सुनी यांनीही गणेश विसर्जन सोहळा हा अत्यंत अनोखा आणि भावस्पर्शी अनुभव असल्याचे सांगितले. ढोल-ताशांचा नाद, पारंपरिक वेशभूषा, भक्तिमय वातावरण आणि नागरिकांचा उत्साह यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची भव्यता अनुभवता आल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातील लोकांचे प्रेम, आपुलकी आणि पाहुण्यांचे स्वागत मनाला भावले. महाराष्ट्रातील संस्कृती आणि उत्सवांचा अनुभव घेण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी येथे आवर्जून यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पर्यटन विभागाच्या विशेष दालनामुळे गणेश विसर्जन मिरवणूक जवळून पाहता आल्याचे त्यांनी सांगितले.

अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद

गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या अनेक परदेशी पर्यटकांनी गणरायाच्या आकर्षक आणि मनमोहक मूर्तींसोबत छायाचित्रे काढली. ढोल-ताशांचा गजर, गणेश मिरवणुकीतील उत्साह आणि भक्तिमय वातावरणातील अविस्मरणीय क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा जागतिक प्रसार

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. परदेशी पर्यटकांना या उत्सवात सहभागी करून घेणे हा महाराष्ट्राच्या परंपरांचा जागतिक पातळीवर प्रसार करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवी उभारी मिळण्यास तसेच राज्याच्या सांस्कृतिक वैभवाची ख्याती जगभर पोहोचण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी सांगितले की, विशेष दालनामुळे पर्यटकांना गणेश विसर्जनाची मिरवणूक जवळून पाहण्याची संधी मिळाली. परदेशी पर्यटकही बाप्पाच्या जयघोषात सहभागी झाले. त्यांचा उत्साह आणि प्रेम पाहून प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

गिरगाव चौपाटीवरील विसर्जन सोहळा परदेशी पर्यटकांसाठी केवळ पर्यटनाचा अनुभव न राहता भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव ठरला. ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिमय वातावरणात आणि गणरायाला निरोप देण्याच्या हृदयस्पर्शी क्षणांत सहभागी होत या पर्यटकांनी महाराष्ट्राच्या आतिथ्यशील संस्कृतीचा अनुभव घेतला.

यावेळी पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे, पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक संतोष जाधव, सहाय्यक संचालक सुशील पवार, रविंद्र पवार, मुख्य लेखाधिकारी विठ्ठल सुडे, कार्यकारी अभियंता आकाश चकोर यांच्यासह संचालनालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र पर्यटनाच्या युवा दूत नवेली देशमुख यांचीही उपस्थिती होती.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.