ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी आता NCMC कार्ड अनिवार्य; १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट कार्डद्वारेच
महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना १ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य होणार आहे. कार्ड नोंदणी, QR पावती, Top-up आणि OTPद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
प्रतिनिधी: देवानंद शिंदे
मुंबई, दि. २६ सप्टेंबर २०२६ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC (National Common Mobility Card) कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. यापुढे सवलतीचे तिकीट NCMC कार्डच्या माध्यमातूनच वितरित करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटी आगार आणि बसस्थानकांवर NCMC कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेणाऱ्या पात्र प्रवाशांनी १ ऑक्टोबरपूर्वी NCMC कार्डची नोंदणी करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
एसटी महामंडळाकडून शासनाच्या निर्देशानुसार विविध सामाजिक घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. त्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतींचा समावेश आहे. या सवलतीच्या प्रवासाचे व्यवस्थापन अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी NCMC कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.
QR कोडच्या पावतीवरही मिळणार सवलत
१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डच्या माध्यमातूनच वितरित केले जाणार आहे. ज्या प्रवाशांकडे Active NCMC कार्ड आहे किंवा NCMC कार्ड नोंदणी केल्याची QR कोड असलेली पावती आहे, त्यांना सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
NCMC कार्डची नोंदणी केल्यानंतर मिळालेली QR कोडयुक्त पावती वाहकाच्या ईटीएम मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे. या कालावधीत प्रवाशांनी आपले NCMC कार्ड Active करून त्यामध्ये आवश्यक रक्कम Top-up करणे गरजेचे आहे.
अधिकृत केंद्रांवर नोंदणीची सुविधा
NCMC कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांची एसटी बसस्थानक व आगार तसेच आगाराच्या हद्दीबाहेरील अधिकृत एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र प्रवाशांना जवळच्या अधिकृत केंद्रावर जाऊन NCMC कार्डची नोंदणी करता येणार आहे.
BHIM Appद्वारे करता येणार Top-up
NCMC कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी BHIM Appच्या माध्यमातून Top-up करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्डच्या मागील बाजूस असलेला QR कोड BHIM Appच्या माध्यमातून स्कॅन करून कार्डमध्ये रक्कम जमा करता येणार आहे.
बोटांचे ठसे न उमटणाऱ्या लाभार्थ्यांसाठी OTPची सुविधा
आधार कार्डवरील बायोमेट्रिक प्रक्रियेदरम्यान बोटांचे ठसे उमटत नसल्यामुळे NCMC कार्ड नोंदणीमध्ये अडचणी येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
अशा प्रवाशांना आधार कार्डशी संलग्न मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTPच्या आधारे NCMC कार्डची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे बायोमेट्रिक अडचणीमुळे पात्र प्रवाशांना सवलतीच्या प्रवासापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी पर्यायी प्रक्रिया उपलब्ध करण्यात आली आहे.
१ ऑक्टोबरपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन
सवलतीच्या प्रवासाची प्रक्रिया अधिक पारदर्शक, डिजिटल आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने NCMC कार्ड प्रणाली लागू करण्यात येत आहे. त्यामुळे अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांनी प्रवास करताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ पूर्वी NCMC कार्डची नोंदणी करून घेऊन ते Active करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1