म्हाडा मुख्यालयाच्या संरक्षक भिंतींवर विद्यार्थ्यांच्या कलाकृती साकारणार; २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान ‘म्हाडा ओपन गॅलेरी २०२६’
म्हाडाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘म्हाडा ओपन गॅलेरी २०२६’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान विद्यार्थ्यांकडून म्हाडा मुख्यालयाच्या संरक्षक भिंतींवर पर्यावरण, संस्कृती आणि सामाजिक जाणीवांवर आधारित भित्तिचित्रे साकारली जाणार आहेत.
मुंबई ब्यूरो : अनिल सावरे
२८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान भित्तिचित्रांची निर्मिती; कला, पर्यावरण आणि सामुदायिक सहभागाला मिळणार प्रोत्साहन
मुंबई, दि. २५ नोव्हेंबर : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त सार्वजनिक जागांचे कलात्मक सुशोभीकरण, सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने ‘म्हाडा ओपन गॅलेरी २०२६’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत २८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत म्हाडा मुख्यालयाच्या दर्शनी संरक्षक भिंतींवर चित्रकला आणि वास्तुविशारद महाविद्यालयांतील विद्यार्थी आकर्षक भित्तिचित्रे साकारणार आहेत.
म्हाडाच्या ‘गृहनिर्माण आनंद निर्देशांक’ (Housing Happiness Index – HHI) या संकल्पनेअंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कला, संस्कृती आणि सामाजिक जाणीव यांच्या माध्यमातून सार्वजनिक जागा अधिक सुंदर, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि आनंददायी बनविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
म्हाडाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीला कलात्मक उपक्रमांची जोड
राज्यातील गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित विविध संस्थांना एकत्र आणत ५ डिसेंबर १९७७ रोजी म्हाडाची स्थापना झाली. गेल्या पाच दशकांच्या वाटचालीत सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासोबतच सामाजिक बांधिलकी, लोककल्याण आणि शाश्वत गृहनिर्माण विकासाला म्हाडाने प्राधान्य दिले आहे.
या गौरवशाली वाटचालीला कलात्मक आणि सामाजिक उपक्रमांची जोड देण्याच्या दृष्टीने ‘म्हाडा ओपन गॅलेरी २०२६’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या माध्यमातून सार्वजनिक जागांना केवळ सुशोभीकरणाचे स्वरूप न देता त्या सर्जनशीलता, सामाजिक संवाद आणि सामुदायिक सहभागाचे व्यासपीठ बनविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आठ संकल्पनांवर आधारित भित्तिचित्रांची निर्मिती
या उपक्रमासाठी सहभागी विद्यार्थ्यांना आठ संकल्पनाधारित विषय देण्यात आले आहेत. त्यामध्ये भविष्याभिमुख घरे व सक्षम समुदाय, जलसाक्षर समुदाय, सशक्त सामायिक सार्वजनिक जागा, स्वच्छ समुदाय व निरोगी भविष्य, समुदायजीवनातील संस्कृती व परंपरा, कौशल्य विकास व आर्थिक संधी, हरित जीवनशैली व शाश्वत समुदाय तसेच शिक्षण, प्रगती आणि सामूहिक विकास या विषयांचा समावेश आहे.
या विषयांच्या अनुषंगाने विद्यार्थी आपल्या कलाकृतींमधून विविध सामाजिक आणि पर्यावरणविषयक संदेश सादर करणार आहेत. महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचा समावेश असलेला समाज, पाणी संवर्धन, वृक्षारोपण, पुनर्वापर, स्वच्छता, सांस्कृतिक वारसा, शिक्षण आणि क्रीडा अशा विविध विषयांना भित्तिचित्रांमध्ये स्थान मिळणार आहे.
ही चित्रे केवळ सजावटीपुरती मर्यादित न ठेवता त्यातून सामाजिक संदेश, सकारात्मक विचार आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
तीन नामांकित शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी सहभागी होणार
‘म्हाडा ओपन गॅलेरी २०२६’ या उपक्रमात रचना संसद कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट्स, विवेकानंद एज्युकेशन सोसायटीस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (VESCOA) आणि सीटीईएस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या तीन शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
प्रत्येक संस्थेतील विद्यार्थ्यांचे चार ते सहा सदस्यांचे गट तयार करण्यात येणार आहेत. संबंधित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी भित्तिचित्रांची संकल्पना, रचना आणि प्रत्यक्ष निर्मिती करणार आहेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलात्मक संकल्पनांचे म्हाडामार्फत परीक्षण करण्यात येईल. त्यानंतर मान्यता मिळालेल्या संकल्पनांनुसारच प्रत्यक्ष चित्रनिर्मिती केली जाणार आहे.
भविष्यात म्हाडाच्या वसाहतींमध्येही उपक्रम राबविण्याची संकल्पना
‘म्हाडा ओपन गॅलेरी २०२६’ हा उपक्रम केवळ मुख्यालयाच्या संरक्षक भिंतींचे सुशोभीकरण करण्यापुरता मर्यादित राहणार नाही. भविष्यात म्हाडाच्या विविध गृहनिर्माण वसाहतींमध्येही अशा प्रकारचे कलात्मक उपक्रम राबविण्याची संकल्पना आहे.
कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून गृहनिर्माण परिसर अधिक आकर्षक बनविणे, नागरिकांमध्ये आपल्या परिसराविषयी आपलेपणा निर्माण करणे आणि सामूहिक जबाबदारीची भावना वाढविणे, हा या उपक्रमाचा व्यापक दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या सामाजिक व पर्यावरणविषयक जाणिवांना कलात्मक अभिव्यक्तीची संधी देणे, हेही या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
सार्वजनिक जागांचा सकारात्मक वापर, पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक सहभाग यांचा संगम घडविणारा ‘म्हाडा ओपन गॅलेरी २०२६’ हा उपक्रम म्हाडाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील एक अभिनव उपक्रम ठरणार आहे.
— वैशाली गडपाले, मुख्य जनसंपर्क अधिकारी, म्हाडा