रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास अनुभवातून समृद्ध झाला – अभिराम भडकमकर
रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि साहित्य क्षेत्रातील अनुभव कथन करताना ज्येष्ठ नाटककार व दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६ मध्ये लेखन, वाचनसंस्कृती आणि एआय तंत्रज्ञानाच्या परिणामांवर विचार मांडले.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
मुंबई, दि. २५ : रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि साहित्य या क्षेत्रांमध्ये काम करताना मिळालेले अनुभव माणसाच्या कलात्मक आणि वैचारिक जडणघडणीला समृद्ध करतात. प्रत्येक माध्यमाची स्वतःची अभिव्यक्ती आणि वेगळी आव्हाने असतात. या प्रवासात सातत्याने शिकत राहणे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार, पटकथालेखक, कादंबरीकार, अभिनेते आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी केले.
मुंबई बुक फेस्टिव्हल २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘फ्रॉम स्टेज टू स्क्रीन’ या विशेष संवाद सत्रात ते बोलत होते. यावेळी त्यांनी रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंतच्या आपल्या प्रवासातील विविध अनुभव, लेखनप्रक्रिया, कलाक्षेत्रातील बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा साहित्य व कलेवर होणारा परिणाम याविषयी मनमोकळेपणाने विचार मांडले. अमेय रानडे यांनी त्यांची मुलाखत घेतली.
या संवादादरम्यान भडकमकर यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयात (एनएसडी) शिक्षण घेत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. नाट्यशिक्षणामुळे अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा विकसित झाला, तसेच रंगभूमीवरील अनुभवांचा पुढील चित्रपट प्रवासात कसा उपयोग झाला, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
चित्रपट लेखनाविषयी बोलताना त्यांनी ‘बालगंधर्व’ आणि ‘पछाडलेला’ यांसारख्या चित्रपटांसाठी पटकथा आणि संवाद लेखन करताना आलेले अनुभव सांगितले. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून त्यातून समाज, संस्कृती आणि मानवी भावविश्वाचे दर्शन घडविण्याची मोठी क्षमता असल्याचे त्यांच्या अनुभवातून अधोरेखित झाले. प्रत्येक कलाकृतीच्या निर्मितीमागे सखोल अभ्यास, निरीक्षण आणि अनुभव यांचे महत्त्व असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय संस्कृतीच्या वैचारिक पायावर भाष्य
भारतीय संस्कृती आणि देशाच्या वैचारिक जडणघडणीविषयी विचार व्यक्त करताना रामायण, महाभारत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले भारतीय संविधान हे भारताच्या वैचारिक व सांस्कृतिक प्रवासातील महत्त्वाचे आधार असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय समाजाची मूल्यव्यवस्था, विचारपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा समजून घेण्यासाठी या ग्रंथांचा आणि संविधानाचा अभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी वाचनसंस्कृतीच्या संवर्धनावरही विशेष भर दिला. पुस्तके अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पुस्तकांच्या माध्यमातून माणसाची विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि त्याला विविध विषयांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
एआय आणि तंत्रज्ञानाचा वापर विवेकाने करावा
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना भडकमकर यांनी तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचे महत्त्व अधोरेखित केले. विज्ञानाचा उपयोग मानवी जीवन सुलभ करण्यासाठी आणि मदतीसाठी केला, तर ते वरदान ठरते; मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अतिआहारी गेल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशारा त्यांनी दिला.
आपल्या म्हणण्याला पुष्टी देताना त्यांनी पूर्वीच्या दूरध्वनीच्या काळाचे उदाहरण दिले. त्या काळात अनेकांना आपल्या परिचितांचे आणि नातेवाइकांचे दूरध्वनी क्रमांक सहज पाठ असायचे. मात्र, मोबाईल फोनच्या वाढत्या वापरामुळे आता मोजकेच क्रमांक लक्षात राहतात. तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असल्या, तरी माणसाच्या स्मरणशक्तीवर आणि दैनंदिन सवयींवर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे; मात्र त्याचा वापर विवेकाने आणि मर्यादेत केला पाहिजे. तंत्रज्ञान हे माणसाच्या मदतीसाठी असावे, माणसाने त्याच्या आहारी जाऊ नये, असा महत्त्वपूर्ण संदेशही अभिराम भडकमकर यांनी या संवादातून दिला.
मुंबई बुक फेस्टिव्हलमधील या संवादामुळे साहित्य, रंगभूमी, चित्रपट आणि आधुनिक तंत्रज्ञान या विविध विषयांवर उपस्थितांना विचारप्रवर्तक अनुभव मिळाला.