गणपती बाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या..! नाशिककरांचा भक्तिभावात बाप्पाला निरोप; २ लाख ४९ हजार ७६ गणेशमूर्तींचे संकलन

नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या १२व्या दिवशी भक्तिभावात गणरायाला निरोप देण्यात आला. यंदा नाशिक महापालिकेने २ लाख ४९ हजार ७६ गणेशमूर्तींचे संकलन केले असून गतवर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ झाली आहे.

Sep 26, 2026 - 16:27
 0  6
गणपती बाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या..! नाशिककरांचा भक्तिभावात बाप्पाला निरोप; २ लाख ४९ हजार ७६ गणेशमूर्तींचे संकलन
नाशिक गणेश विसर्जन २०२६, नाशिक गणेशोत्सव, गणेशमूर्ती संकलन, गणपती विसर्जन, नाशिक महानगरपालिका, गणेशोत्सव २०२६, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, गणेशमूर्ती दान, नाशिक गणेश विसर्जन मिरवणूक, गिरीश महाजन, नाशिककर, गणेशमूर्ती संकलन २०२६

नाशिक ब्यूरो:

नाशिक : “गणपती बाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या..!” या जयघोषाने, ढोल-ताशांच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणात नाशिक शहरातील गणेशोत्सवाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणेशोत्सवाच्या १२व्या दिवशी नाशिककरांनी मोठ्या उत्साहात आणि जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप दिला.

नाशिक शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच गणरायाची विधिवत पूजा व आरती करून करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, पोलीस अधिकारी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिक महानगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मानाच्या गणपतीचेही विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी आखाडा परिषदेचे प्रवक्ते भक्ती चरणदास महाराज, डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज, महापौर हिमगौरी आहेर आडके, आमदार प्रा. देवयानी फरांदे, उपमहापौर विलास शिंदे, नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, माजी आमदार बाळासाहेब सानप, सुधाकर बडगुजर, प्रभाग सभापती सुरेश पाटील, रोहिणी पिंगळे, माजी महापौर विनायक पांडे, रामसिंग बावरी यांच्यासह मनपा नगरसेवक, पदाधिकारी व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, नाशिक महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, विभागीय अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ढोल वाजवत मान्यवरांचा मिरवणुकीत सहभाग

मुख्य विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक ढोल पथकांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः पारंपरिक ढोल वाजवत मिरवणुकीत उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला.

आमदार प्रा. देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनीही गरीब रथ ढोल पथकातील ढोल वाजवून तसेच ध्वज फिरवून मिरवणुकीचा आनंद घेतला.

माऊली वारकरी पथकातही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमहापौर विलास शिंदे आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सहभाग नोंदवत टाळ वाजवून भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला.

मनपाच्या मानाच्या गणपतीचे मूर्तीदान

नाशिक महानगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मानाच्या गणपतीची अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या हस्ते आरती व विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर पंचवटी कारंजा येथील कृत्रिम तलावात रात्री ८.३५ वाजता प्रातिनिधिक स्वरूपात गणेशमूर्तीचे विसर्जन करून मूर्तीदान करण्यात आले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, रवी पाटील, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि मनपा अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

यंदा २ लाख ४९ हजार ७६ गणेशमूर्तींचे संकलन

गणेशोत्सवाच्या काळात नाशिक महानगरपालिकेने पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत शहरातील विविध भागांत गणेशमूर्ती संकलनाची व्यापक व्यवस्था केली होती. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने यंदा शहरातून तब्बल २,४९,०७६ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले.

गतवर्षी म्हणजेच सन २०२५ मध्ये २,२६,१७७ गणेशमूर्तींचे संकलन झाले होते. यंदा त्यापेक्षा २२,८९९ गणेशमूर्ती अधिक संकलित झाल्या असून, गतवर्षीच्या तुलनेत गणेशमूर्ती संकलनात सुमारे १० टक्के वाढ झाली आहे.

विभागनिहाय गणेशमूर्ती संकलन

सन २०२६ मध्ये पंचवटी विभागातून सर्वाधिक १,०४,४८० गणेशमूर्तींचे संकलन झाले. त्यापाठोपाठ नाशिक रोडमधून ५०,२८३, नवीन नाशिकमधून ३२,८६६, सातपूरमधून २४,८९५, नाशिक पश्चिममधून २४,६४८ आणि नाशिक पूर्वमधून ११,९०४ गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या.

२ लाख ४० हजारांहून अधिक पीओपी मूर्तींचे संकलन

सन २०२६ मध्ये संकलित झालेल्या २,४९,०७६ गणेशमूर्तींपैकी २,४०,६३३ मूर्ती पीओपीच्या होत्या. त्यापैकी ६ फुटांपेक्षा कमी आकाराच्या २,४०,४७९ मूर्ती असून, ६ फुटांपेक्षा अधिक आकाराच्या १५४ मूर्तींचा समावेश आहे. तसेच ८,४४३ शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले.

नदीपात्र प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नाशिककरांचा पुढाकार

गणेशोत्सवाच्या काळात नदीपात्र आणि जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने गणेशमूर्ती संकलनाची व्यापक व्यवस्था केली होती. गणेशमूर्ती थेट नदीपात्रात विसर्जित न करता त्या महापालिकेच्या अधिकृत संकलन केंद्रांवर सुपूर्द करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते.

गणेशमूर्ती, निर्माल्य किंवा अन्य पूजासाहित्य नदीपात्रात न टाकता महापालिकेच्या संकलन व्यवस्थेचा वापर करण्याला नाशिककरांनी दिलेला प्रतिसाद पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे.

गणेशमूर्ती संकलनासाठी ९३५ कर्मचारी कार्यरत

गणेशोत्सव कालावधीत गणेशमूर्ती संकलन, वाहतूक, स्वच्छता आणि संबंधित व्यवस्थेसाठी नाशिक महापालिकेच्या विविध विभागांमध्ये एकूण ९३५ कर्मचारी कार्यरत होते.

यामध्ये पंचवटी विभागात २७६, सातपूर २००, नवीन नाशिक १३५, नाशिक पूर्व १३७, नाशिक रोड १२२ आणि नाशिक पश्चिम विभागात ६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच संबंधित यंत्रणांनी गणेशोत्सवाच्या कालावधीत संकलन, वाहतूक आणि स्वच्छता व्यवस्थेची कामे नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.

नागरिक, गणेश मंडळे आणि स्वयंसेवकांचे आभार

गतवर्षीच्या तुलनेत यंदा २२,८९९ गणेशमूर्ती अधिक संकलित झाल्याने नाशिककरांनी महापालिकेच्या संकलन व्यवस्थेला दिलेला प्रतिसाद अधोरेखित झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात सहकार्य करणाऱ्या नाशिक शहरातील सर्व नागरिक, गणेश मंडळे, स्वयंसेवक, अधिकारी-कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांचे महानगरपालिकेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

यापुढेही गणेशमूर्ती व निर्माल्य नदीपात्रात न टाकता महानगरपालिकेच्या अधिकृत संकलन व्यवस्थेकडे सुपूर्द करावे आणि नाशिक शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.