मानखुर्द पोलिसांची धडक कारवाई: अपहरण झालेल्या २ वर्षांच्या चिमुरड्याची ४० तासांत सुखरूप सुटका; दाम्पत्याला अटक

मानखुर्द येथून अपहरण झालेल्या २ वर्षे ४ महिन्यांच्या चिमुरड्याची पोलिसांनी अवघ्या ४० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप सुटका केली असून अपहरण करणाऱ्या पती-पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत

Sep 26, 2026 - 20:36
 0  6
मानखुर्द पोलिसांची धडक कारवाई: अपहरण झालेल्या २ वर्षांच्या चिमुरड्याची ४० तासांत सुखरूप सुटका; दाम्पत्याला अटक
मानखुर्द पोलीस, बालक अपहरण, मुंबई पोलीस, गुन्हेगारी, मानखुर्द क्राईम न्यूज, Mankhurd Police, Child Kidnapping Mumbai, Mumbai Police Crime Update

मुंबई ब्यूरो: अनिल सावरे

मानखुर्द पोलिसांची धडक कामगिरी: अपहरण झालेल्या २ वर्षांच्या चिमुरड्याची ४० तासांत सुखरूप सुटका; आरोपी दाम्पत्य गजाआड

मुंबई:

मानखुर्द परिसरातून अचानक बेपत्ता झालेल्या २ वर्षे ४ महिन्यांच्या चिमुरड्याची पोलिसांनी अवघ्या ४० तासांत सुखरूप सुटका केली आहे. या संवेदनशील प्रकरणात मानखुर्द पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास चक्रे फिरवून अपहरण करणाऱ्या एका दाम्पत्याला अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे संबंधित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे.   

मार्केट रोड परिसरातून झाले होते अपहरण मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास मानखुर्द येथील मार्केट रोड परिसरात कुटुंबीयांसोबत असलेला २ वर्षे ४ महिन्यांचा चिमुरडा अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी शोध घेऊनही मुलगा न सापडल्याने त्यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३७(२) अन्वये तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला.   

तपासासाठी ८ विशेष पथके गठीत प्रकरणाचे गांभीर्य आणि लहान बालकाची सुरक्षितता लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शोधमोहीम हाती घेण्यात आली. चिमुरड्याच्या शोधासाठी मानखुर्द, देवनार, आरसीएफ व ट्रॉम्बे पोलीस ठाण्यांची मिळून तब्बल ८ विशेष पथके तयार करण्यात आली.   

तपास पथकांनी घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची बारकाईने पाहणी केली असता, एक संशयित महिला त्या बालकाला सोबत घेऊन जाताना दिसून आली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत शोधमोहीम अधिक तीव्र केली. बाळ शहराबाहेर किंवा रेल्वेमार्गे नेले जाण्याची शक्यता गृहीत धरून तपास यंत्रणा सतर्क करण्यात आली होती.   

दिवस-रात्र अथक प्रयत्नांनंतर यश; आरोपी दाम्पत्य गजाआड अखेर पोलिसांनी सलग ४० तासांच्या अहोरात्र प्रयत्नांनंतर चिमुरड्याचा सुखरूप शोध घेतला. बालकाचे अपहरण करणारी महिला मुस्कान भोलाकुमार साह आणि तिला या गुन्ह्यात मदत करणारा तिचा पती भोलाकुमार जग्गु सहा (दोन्ही रा. दुर्गामाता मंदिर गल्ली, महाराष्ट्र नगर, मानखुर्द, मुंबई) या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून बालकाची सुरक्षित सुटका करून त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हरवलेला पोटचा गोळा सुखरूप परत मिळाल्याने कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.  

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. धनंजय कुलकर्णी, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-०६) समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त (ट्रॉम्बे विभाग) प्रमोद कोकाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिलाल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवळे, ओऊळकर, पाटील, तडवी यांच्यासह उपनिरीक्षक, अंमलदार आणि तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.   

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.