गिरगाव चौपाटीवर गणरायाला मान्यवरांकडून पुष्पवृष्टी; ‘कुबुद्धीचे विसर्जन होऊन सर्वांना सुबुद्धी येवो’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायावर पुष्पवृष्टी केली. कुबुद्धीचे विसर्जन होऊन सर्वांना सुबुद्धी मिळावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली.
प्रतिनिधी :नरेश शिंदे
मुंबई, दि. २५ सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त गिरगाव चौपाटी येथे झालेल्या गणेश विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायावर पुष्पवृष्टी करून भावपूर्ण निरोप दिला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो’, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील विविध ठिकाणी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरळीतपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः मुंबई आणि पुणे शहरात पोलीस प्रशासन तसेच महानगरपालिकांनी केलेल्या व्यवस्थेमुळे विसर्जन मिरवणुका शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील तसेच जगातील चांगल्या आणि सक्षम पोलीस दलांपैकी एक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजातील वाईट विचारांचे विसर्जन होऊन प्रत्येकाला चांगली बुद्धी मिळावी, अशी भावना व्यक्त करत त्यांनी, ‘कुबुद्धीचे विसर्जन करा आणि सगळ्यांनाच सुबुद्धी येवो,’ अशी प्रार्थना केली.
शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी शिस्त आणि पर्यावरणपूरक उत्सवाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवासाठी अतिशय शिस्तबद्ध नियोजन केल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबईतील विविध विसर्जन स्थळांवर प्रशासन, पोलीस यंत्रणा, महापालिका कर्मचारी, स्वयंसेवक आणि गणेश मंडळांच्या समन्वयातून विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे गणेशभक्तांना विसर्जनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या.
मान्यवरांची उपस्थिती
गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन सोहळ्यास कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, खासदार मिलिंद देवरा, आमदार अमित साटम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासे, अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, उपायुक्त चंदा जाधव आणि प्रशांत सपकाळ, सहायक आयुक्त संतोष साळुंके यांच्यासह विविध देशांचे भारतातील महावाणिज्यदूत आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
गणरायाला भावपूर्ण निरोप देताना गिरगाव चौपाटीवर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0