भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य द्या; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावांच्या रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षण व घरकुल सुविधांचा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.

Sep 23, 2026 - 23:07
 0  7
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य द्या; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश
भामरागड विकास, अतिदुर्गम गावे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, गडचिरोली, लष्कर, गोपणार, मुरडपार, हॅलोदांडी, तिरंगी, वनहक्क पट्टे, 7/12 उतारा, आरोग्य सेवा, घरकुल योजना, रस्ते पूल विकास, सेवा संकल्प अभियान

प्रतिनिधी: राजेंद्र किलनाके 

गडचिरोली, दि. 23 सप्टेंबर : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर, गोपणार, मुरडपार, हॅलोदांडी आणि तिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत जास्त पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पंडा यांनी भामरागड तालुक्याचा विस्तृत दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत सुरू असलेल्या कामांसह पायाभूत सुविधा आणि नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या शासकीय सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह विविध विभागांचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

अतिदुर्गम गावांमध्ये दुचाकीने प्रत्यक्ष पाहणी

या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हाधिकारी पंडा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी होड्री येथून लष्कर आणि गोपणार या अतिदुर्गम गावांपर्यंत दुचाकीने पोहोचले.

प्रत्यक्ष क्षेत्रभेटीदरम्यान मार्गावरील दळणवळणाची स्थिती, रस्ते, पूल तसेच दुर्गम गावांमधील विविध पायाभूत सुविधांची पाहणी करण्यात आली. स्थानिक परिस्थिती आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांची माहिती घेऊन संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.

पाच गावांच्या विकासावर विशेष भर

लष्कर, गोपणार, मुरडपार, हॅलोदांडी आणि तिरंगी या गावांमधील पात्र नागरिकांना विविध शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

विविध योजनांचे प्रभावी अभिसरण करून या गावांमधील मूलभूत सुविधांच्या कमतरता दूर करण्यासाठी कालबद्ध कार्यवाही करावी. भौगोलिक दुर्गमतेमुळे कोणताही पात्र नागरिक शासकीय योजना आणि सेवांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी पंडा, पोलीस अधीक्षक रमेश आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गाडे यांनी लष्कर व गोपणार गावांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. रस्ते, पूल, आरोग्य आणि अन्य पायाभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित कामांवर संबंधित विभागांनी समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.

16 वनहक्क पट्टेधारकांना 7/12 उताऱ्यांचे वाटप

दौऱ्यादरम्यान वनहक्क प्राप्त नागरिकांच्या महसुली अभिलेखांबाबतही कार्यवाही करण्यात आली. लष्कर येथील 5 आणि गोपणार येथील 11 अशा एकूण 16 वनहक्क पट्टेधारकांना 7/12 उताऱ्यांचे वाटप करण्यात आले.

वनहक्कधारकांना त्यांच्या पात्रतेनुसार विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी

जिल्हाधिकारी पंडा यांनी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. परिसरातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचीही त्यांनी पाहणी केली.

अतिदुर्गम भागातील नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा नियमित आणि वेळेत उपलब्ध होतील, याची आरोग्य यंत्रणेने दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनांचा लाभ वेळेत मिळवून देण्याबरोबरच प्रलंबित घरकुलांच्या कामांना गती देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.

होड्री येथील बेली पूल आणि जिल्हा परिषद शाळेची पाहणी

दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी होड्री येथील बेली पुलाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सद्यस्थितीची माहिती घेतली. रस्ते व पुलांशी संबंधित आवश्यक कामांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी होड्री येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळेतील शैक्षणिक तसेच मूलभूत सुविधांची माहिती घेतली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाने विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

हेमलकसा लोकबिरादरी शाळेलाही भेट

जिल्हाधिकारी पंडा यांनी हेमलकसा येथील लोकबिरादरी शाळेलाही भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रम आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेतली.

भामरागड तालुक्याची भौगोलिक दुर्गमता लक्षात घेऊन विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित प्रलंबित कामे आणि अडचणींचे विभागनिहाय निराकरण करून विकासकामांना गती द्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

विशेषतः अतिदुर्गम गावांमध्ये रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षण, घरकुल तसेच अन्य शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ वेळेत पोहोचवण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

या दौऱ्यात एटापल्लीचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत, भामरागडचे उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांच्यासह विविध विभागांचे जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.