आष्ट्टी व अहेरीतील रुग्णालयांची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पाहणी; औषधसाठा, आहार व आरोग्य सेवांच्या गुणवत्तेबाबत सूचना
गडचिरोली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि गावंडे यांनी आष्ट्टी व अहेरीतील रुग्णालयांची पाहणी करून औषधसाठा, आहार व आरोग्य सेवांबाबत सूचना दिल्या.
प्रतिनिधी : राजेंद्र किलनाके
गडचिरोली, दि. २८ सप्टेंबर (जिमाका) : जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि गावंडे यांनी २५ सप्टेंबर रोजी आष्ट्टी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी, यासाठी औषधसाठा, रुग्णांचा आहार, नोंदी आणि उपलब्ध साधनसामग्रीच्या वापराबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
आष्ट्टी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी
आष्ट्टी ग्रामीण रुग्णालयातील बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग, प्रयोगशाळा, प्रसूती कक्ष आणि शस्त्रक्रिया कक्षाची डॉ. गावंडे यांनी पाहणी केली.
गर्भवती महिलांच्या आवश्यक तपासण्या नियमितपणे करण्यात याव्यात, तसेच राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांनुसार आवश्यक बाबींची पूर्तता करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या उपचारांची आणि लाभार्थ्यांच्या नोंदी व्यवस्थित ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
वापरास अयोग्य ठरलेले साहित्य रुग्ण कक्षांमधून सुरक्षित ठिकाणी हलवून त्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
महिला व बाल रुग्णालयातील सुविधांचा आढावा
अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात सेवा, सोनोग्राफी, लसीकरण, प्रयोगशाळा, औषध भांडार आणि रुग्णांच्या आहार व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
औषधांची योग्य पद्धतीने साठवणूक व वर्गीकरण करावे. तसेच मुदत संपण्याच्या जवळ असलेल्या औषधांची नियमित छाननी करून नियमानुसार कार्यवाही करावी, असे डॉ. गावंडे यांनी सांगितले.
यावेळी वैद्यकीय तसेच प्रशासकीय मनुष्यबळाची गरज आणि उपलब्ध मनुष्यबळाचाही त्यांनी आढावा घेतला.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेळापत्रक दर्शनी ठिकाणी लावण्याच्या सूचना
सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कर्तव्य वेळापत्रक दर्शनी ठिकाणी लावण्यात यावे. तसेच आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीतील (HMIS) माहितीची नियमित नोंद आणि पडताळणी करण्यात यावी, असे निर्देश डॉ. गावंडे यांनी दिले.
पोषण पुनर्वसन केंद्रातील बालकांना तसेच त्यांच्या मातांना नियमानुसार पौष्टिक आहार देण्यात यावा. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आहाराची दररोज गुणवत्ता तपासून त्याची नोंद ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतची माहितीही यावेळी घेण्यात आली.
अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा आढावा
अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील नोंदणी विभाग, औषध भांडार, असंसर्गजन्य रोग विभाग, बाह्यरुग्ण विभाग आणि नेत्र विभागाची पाहणी करून दैनंदिन कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
रुग्णांना आवश्यक आरोग्य सेवा वेळेत मिळतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयांकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश डॉ. गावंडे यांनी दिले.
आरोग्य सुविधांची नियमित पाहणी, उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर आणि रुग्णसेवेच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना या पाहणीदरम्यान देण्यात आल्या.