वनसंपदेच्या व्यवस्थापनातून जैवविविधता संवर्धनासह आर्थिक विकास साधा : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

गडचिरोलीतील वनसंपदेचे शाश्वत व्यवस्थापन, बांबू मूल्यवर्धन, सामूहिक वनहक्क आणि मानव-वन्यजीव संघर्ष नियंत्रणासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्याच्या सूचना सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिल्या.

वनसंपदेच्या व्यवस्थापनातून जैवविविधता संवर्धनासह आर्थिक विकास साधा : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
गडचिरोली वनसंपदा, आशिष जयस्वाल, जैवविविधता संवर्धन, सामूहिक वनहक्क, बांबू लागवड, बांबू मूल्यवर्धन, मानव वन्यजीव संघर्ष, हत्तींच्या हालचाली, वन महसूल, जिल्हा वन निधी, वन व्यवस्थापन, गडचिरोली

प्रतिनिधी: देवानंद शिंदे 

गडचिरोली, दि. १ ऑक्टोबर (जिमाका): जिल्ह्यातील वनसंपदेचे शाश्वत व्यवस्थापन करताना वन्यजीव आणि जैवविविधतेचे संवर्धन तसेच वनाधारित आर्थिक विकासाच्या उपलब्ध संधींचा सखोल अभ्यास करावा, अशा सूचना सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी वन विभागाला दिल्या.

सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे, जिल्ह्यातील सर्व उपवनसंरक्षक तसेच वरिष्ठ वन अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सामूहिक व वैयक्तिक वनहक्क, बांबू लागवड व मूल्यवर्धन, वन महसूल, मानव-वन्यजीव संघर्ष आणि वनसंपत्तीच्या डिजिटल नोंदी यांसह विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

वनहक्क व्यवस्थापनात पारदर्शकतेवर भर

सामूहिक आणि वैयक्तिक वनहक्कांतर्गत मान्य करण्यात आलेल्या क्षेत्रांचा वापर संबंधित कायद्यांच्या चौकटीत व्हावा, असे निर्देश ॲड. जयस्वाल यांनी दिले. सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्या आणि पेसा ग्रामसभांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन व्यवस्थापनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामसभांचे वैधानिक अधिकार आणि ग्रामपंचायतींची संबंधित भूमिका विचारात घेऊन निधी व्यवस्थापन व लाभवाटप अधिक पारदर्शक करण्याच्या पर्यायांचा अभ्यास करावा. संबंधित कामे आणि उत्पन्नावर मोजक्या व्यक्तींचे नियंत्रण राहू नये, तसेच सर्व पात्र ग्रामस्थांपर्यंत नियमानुसार लाभ पोहोचावा, यासाठी आवश्यक नियमावलीची तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

विद्यमान कायदे व नियमांमध्ये सुधारणा आवश्यक असल्यास त्याचा अभ्यास करून त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बांबू लागवडीतून उत्पन्नाच्या संधी

बांबू लागवड, व्यवस्थापन आणि मूल्यवर्धनाच्या संधींबाबतही बैठकीत चर्चा झाली. सागवानासारख्या दीर्घकालीन वृक्षपिकांच्या तुलनेत बांबूपासून तुलनेने कमी कालावधीत उत्पन्न मिळविण्याची क्षमता असल्याचे सहपालकमंत्र्यांनी नमूद केले.

जिल्ह्यातील योग्य क्षेत्रांची पाहणी करून स्थानिक परिस्थितीला अनुरूप तसेच आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या व्यवहार्य बांबू उत्पादनाचे मॉडेल विकसित करावे, असे त्यांनी सांगितले. बांबू उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी उत्पादन, मूल्यवर्धन, बाजारपेठ आणि महसूल या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

‘जिल्हा वन निधी’चा अभ्यास

जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या धर्तीवर ‘जिल्हा वन निधी’ निर्माण करता येईल का, याचाही अभ्यास करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. विशेषतः इमारती लाकडाच्या विक्रीतून मिळणाऱ्या वन महसुलातील १० ते २० टक्के हिस्सा ग्रामसभा आणि वनालगतच्या गावांच्या विकासासाठी राखीव ठेवण्याच्या संकल्पनेची कायदेशीर व आर्थिक व्यवहार्यता तपासावी, असे ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.

या अभ्यासाच्या आधारे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मानव-वन्यजीव संघर्ष नियंत्रणासाठी नियोजन

शेती संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या सौर कुंपण आणि ‘झटका मशीन’च्या सुरक्षित वापराचा आढावा घेऊन वन्यजीवांना इजा किंवा दुर्घटना होणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले.

शेतांच्या तसेच गावांच्या सीमांवर नैसर्गिक कुंपण म्हणून काटेरी **‘कटांग बांबू’**ची दाट लागवड करण्याचा पर्याय कितपत उपयुक्त ठरू शकतो, याचीही तपासणी करावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात हत्तींच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठीही बैठकीत चर्चा झाली. हत्तींच्या भ्रमण व स्थलांतर मार्गांचा अभ्यास करून वनक्षेत्रातच चारा आणि पाण्याची उपलब्धता वाढविण्याचे नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.

जंगलातील योग्य ठिकाणी तृणभूमी विकसित करणे, पाणवठे निर्माण करणे तसेच गवत, बांबू आणि इतर योग्य खाद्य वनस्पतींची उपलब्धता वाढविण्याच्या उपाययोजनांचा विचार करावा. हत्तींचा शेतांमध्ये आणि लोकवस्तीत प्रवेश कमी करण्याच्या दृष्टीने या उपाययोजनांची उपयुक्तता तपासून नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वनसंपत्तीच्या डिजिटल नोंदींना गती

वनसंपत्तीची अचूक माहिती संकलित करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. इंडियन स्कूल ऑफ बिझनेस तसेच विविध ॲप्सच्या माध्यमातून सुरू असलेले वनसंपत्तीचे नकाशांकन आणि नमुना सर्वेक्षणाचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

संकलित माहितीचा उपयोग वनसंपत्तीचे संवर्धन, व्यवस्थापन आणि वनाधारित आर्थिक उपक्रमांच्या नियोजनासाठी करावा, असेही बैठकीत सांगण्यात आले.

वन विभागाने केवळ नियामक जबाबदारीपुरते मर्यादित न राहता जैवविविधता संवर्धन आणि शाश्वत आर्थिक विकासासाठी उपलब्ध संधींचाही अभ्यास करावा. पर्यावरणीय संतुलन कायम राखत वनसंपदेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यावर भर द्यावा, असे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी यावेळी सांगितले.