छत्रपती संभाजीनगरात ‘कलमवीर पुरस्कार २०२६-२७’ सोहळा दिमाखात; ११ कर्तृत्ववानांचा गौरव
दैनिक लढणारा कलमवीरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ‘कलमवीर पुरस्कार २०२६-२७’ सोहळ्यात विविध क्षेत्रातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ११ मान्यवरांचा गौरव करण्यात आला. समाजाभिमुख, संविधाननिष्ठ आणि निर्भीड पत्रकारितेचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर | ब्यूरो
दैनिक **‘लढणारा कलमवीर’**च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘कलमवीर पुरस्कार २०२६-२७’ गौरव सोहळा छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना आझाद रिसर्च सेंटर अँड लायब्ररी येथे अत्यंत दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर दैनिकाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विशेष प्रकाशनाचे अनावरण करण्यात आले.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ११ कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा मान्यवरांच्या हस्ते ‘कलमवीर पुरस्कार २०२६-२७’ प्रदान करून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास माजी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ज्येष्ठ साहित्यिक फ. मु. शिंदे, पंढरीनाथ डिगुळे (सेवानिवृत्त एसबीआय व्यवस्थापक) यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी बोलताना डॉ. भागवत कराड यांनी ‘लढणारा कलमवीर’ या वर्तमानपत्राने अल्पावधीतच महाराष्ट्रभर स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचे सांगितले. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे, प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि संविधानिक मूल्यांवर आधारित दर्जेदार पत्रकारिता करणे ही या वर्तमानपत्राची जमेची बाजू असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही देत दैनिकाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ साहित्यिक फ. मु. शिंदे यांनी आपल्या मनोगतात *‘लढणारा कलमवीर’*ने अवघ्या एका वर्षात पत्रकारितेत स्वतंत्र स्थान निर्माण केल्याचे सांगितले. निस्वार्थ, निपक्ष आणि प्रखर लेखणीच्या बळावर समाजातील प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणारी पत्रकारिता हीच या वर्तमानपत्राची खरी ताकद असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे प्रभावी आणि ओघवते सूत्रसंचालन आकाशवाणीच्या बातमी संचालिका तथा अध्यापिका अपर्णा मॅडम यांनी केले. मा. शि. कोटकर यांनी आभार प्रदर्शन केले. ‘वंदे मातरम्’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या भव्य सोहळ्याचे यशस्वी आयोजन मुख्य संपादक पंडित दौ. तिडके, प्रा. अर्जुनराव मुटकुळे, अॅड. जीवनजी दराडे, मा. शि. कोटकर, वसंतराव देशमुख, बबन राऊत तसेच महाराष्ट्रभरातून उपस्थित राहिलेल्या दैनिक लढणारा कलमवीर आणि कलमवीर मराठी लाईव्हच्या जिल्हा व तालुका प्रतिनिधींच्या सक्रिय सहभागातून करण्यात आले.
कर्तृत्वाचा गौरव, समाजाप्रती बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित पत्रकारितेचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0