घरफोडी करून चार महिने पोलिसांना गुंगारा देणारे चार आरोपी बिहारमधून जेरबंद; १५ तोळे सोन्याचे दागिने जप्त
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घरफोडी प्रकरणातील चार आरोपींना बिहारमधून अटक केली. चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपींकडून सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, उत्तर महाळुंगे पोलिसांची ही उल्लेखनीय कारवाई आहे.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. २५ : घरफोडी करून तब्बल चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या चार आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, उत्तर महाळुंगे पोलिसांनी केलेली ही कारवाई गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बंद घराचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने चोरी केले होते. याप्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली.
तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि विविध राज्यांमध्ये केलेल्या पडताळणीतून आरोपी बिहारमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने बिहारमध्ये जाऊन सापळा रचत चारही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी घरफोडीचा गुन्हा कबूल केला.
आरोपींकडून चोरीस गेलेले सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत अंदाजे १२ लाख ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले, जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील पुढील तपास उत्तर महाळुंगे पोलीस करत आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये निक्कुकुमार देवकी सिंह, राजकुमार देवकी सिंह, राजकुमार ऊर्फ प्रेमकुमार विजय पासवान आणि दिलीप पटेल विनोद सिंह यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी बिहार राज्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त स्वेता वेडकेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया इंकाम यांच्या नेतृत्वात उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0