मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’; ४,००० महिलांना मोफत किचन गार्डन किट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप महिला मोर्चातर्फे ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ आयोजित करण्यात आला असून ४,००० महिलांना मोफत किचन गार्डन किटचे वितरण व आधुनिक सेंद्रिय गृह-कृषीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Jul 24, 2026 - 03:37
 0  2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाचा ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’; ४,००० महिलांना मोफत किचन गार्डन किट
देवेंद्र फडणवीस, भाजप महिला मोर्चा, देवाभाऊ कृषी माऊली सोहळा, किचन गार्डन किट

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड, दि. २३ जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरातील ४,००० महिलांना मोफत ‘किचन गार्डन किट’ वितरित करण्यात येणार असून आधुनिक सेंद्रिय गृह-कृषीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही केले जाणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे तसेच माजी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांनी दिली.

हा कार्यक्रम शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी सकाळी ग.दि. माडगूळकर प्रेक्षागृह (लहान हॉल), पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे.

महिलांना मिळणार आधुनिक गृह-कृषीचे मार्गदर्शन

कार्यक्रमात शहरी भागातील महिलांना कमी जागेत, बाल्कनी किंवा गच्चीवर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला कसा पिकवावा याबाबत नामांकित नर्सरी तज्ज्ञ, हायड्रोपोनिक्स सल्लागार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मोफत ‘किचन गार्डन किट’चे वितरण

उपस्थित महिलांना पर्यावरणपूरक कापडी पिशवीमध्ये पाच प्रकारच्या उच्च दर्जाच्या हायब्रीड भाज्यांचे बियाणे, सेंद्रिय खताची पिशवी आणि पाण्याचा स्प्रेअर असलेले ‘किचन गार्डन किट’ मोफत देण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांना घरच्या घरी विषमुक्त भाजीपाला उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

महिला सक्षमीकरणासोबतच सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांनी परिसरातील सर्व महिला भगिनींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0