‘अलग, पर कम नहीं’; गणपती बाप्पांशी ‘द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांचे अनोखे नाते
द ब्लेस्ड वन्स’च्या विशेष मुलांनी गणेशोत्सवानिमित्त पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, ग्रेटर नोएडा आणि पटना येथील केंद्रांमध्ये उत्साहात गणपती बाप्पांचे स्वागत केले. ‘वेगळे असणे म्हणजे कमी असणे नव्हे’ असा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
प्रतिनिधी : रोहन सोनाळे
पुणे : गणेश चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त ‘द ब्लेस्ड वन्स’च्या पुणे, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, ग्रेटर नोएडा आणि पटना येथील केंद्रांमध्ये गणपती बाप्पांच्या स्वागताचा उत्साह पाहायला मिळाला. केंद्रातील विशेष मुलांनी फुले, रंगीबेरंगी सजावट आणि आकर्षक रोषणाईने परिसर सजवत बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी केली. मात्र, या मुलांसाठी गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण न राहता त्यांच्या भावविश्वाशी जोडलेला एक खास अनुभव ठरला.
‘अलग, पर कम नहीं’ या संदेशातून विशेष मुलांचे गणपती बाप्पांशी असलेले अनोखे नाते यावेळी अधोरेखित करण्यात आले. भगवान गणेशांचे शरीर मानवी असून मस्तक हत्तीचे आहे. त्यांचे रूप इतर देवतांपेक्षा वेगळे असले तरी कोणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी त्यांचीच पूजा केली जाते. त्यांच्या वेगळेपणाकडे कधीही कमीपणाच्या दृष्टीने पाहिले जात नाही.
याच भावनेतून ‘द ब्लेस्ड वन्स’ विशेष मुलांना वेगळेपणाचा स्वीकार आणि स्वतःच्या ओळखीचा अभिमान यांची जाणीव करून देण्याचे काम करते. वेगळे असणे ही चूक नाही आणि समाजाकडून स्वीकारले जाण्यासाठी स्वतःला बदलण्याची आवश्यकता नाही, हा विचार या उपक्रमातून मांडण्यात आला.
गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सर्व केंद्रांमध्ये मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. फुलांची सजावट, रंगीबेरंगी आरास आणि रोषणाई करताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता. या सहभागातून मुलांनी शब्दांपलीकडचा आनंद, भक्ती आणि आपलेपणाची भावना व्यक्त केली.
‘द ब्लेस्ड वन्स’चे संस्थापक अभिमतेज प्रियदर्शी म्हणाले, “विशेष मुलांचे वेगळेपण हीच त्यांची सुंदरता आहे. गणपती बाप्पांचा संदेशही प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्याचा आहे. वेगळे असणे किंवा कमी असणे असा प्रश्नच नाही; प्रत्येक व्यक्तीची स्वतःची ओळख, क्षमता आणि वैशिष्ट्य असते.”
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विशेष मुलांची ओळख, त्यांची क्षमता आणि त्यांच्या वेगळेपणाचा सन्मान करण्याचा संदेश देण्यात आला. बाप्पांच्या स्वागताच्या माध्यमातून या मुलांनी समाजासमोर एक सकारात्मक विचार मांडला—वेगळे असणे म्हणजे कमी असणे नव्हे; प्रत्येक व्यक्ती तितकीच खास आणि सन्मानास पात्र आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
संजय गायकवाड
मोबाईल : 9604764228